मुलांनो, पुस्तकं तुमची वाट पाहताहेत!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

ज्येष्ठ लेखिका विजया वाड यांच्या पुढाकाराने लवकरच मुंबईतील शाळांमध्ये `चला वाचू या` उपक्रम राबवला जाणार आहे...

मुंबई : लहान मुलांना वाचनाची गोडी नसल्याची तक्रार नेहमीच केली जाते; परंतु मुलांना वाचनाकडे वळवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. ही परिस्थिती ध्यानात घेऊन ज्येष्ठ लेखिका विजया वाड यांनी मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी `चला वाचू या` प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी बालसाहित्यकारांची फौज बांधली असून, मुंबईतील काही शाळांमध्ये ही वाचन चळवळ निरंतर सुरू ठेवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

हे वाचलं का? `गंगूबाई काठियावाडी` वास्तवापेक्षा वेगळाच? कोण म्हणतंय असं...

एका साहित्य संमेलनाला सुमारे ५०० मुले उपस्थित होती. त्यांना विचारले, की पाठ्यपुस्तके सोडून तुम्हाला आवडणाऱ्या पुस्तकांची नावे सांगा. त्या वेळी मुलांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला, असे विजया वाड यांनी सांगितले. म्हणजे आम्हीच पुस्तके लिहितो आणि आम्हीच वाचतो, अशी अवस्था दिसते. मुलांपर्यंत पुस्तके पोहोचावीत आणि त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी `चला वाचू या` वाचन चळवळ हाती घेतली, असे त्या म्हणाल्या. 

वाचायलाच हवं : घरच्या घरी `ब्लड शुगर` कंट्रोेल करण्याचे सोपे पर्याय...

`चला वाचू या` उपक्रमासाठी १० ते १२ बालसाहित्यिक मुलांसाठी अगदी छोटी पुस्तके लिहिणार आहेत. छोटी पुस्तके, बोल्ड टाईप, चित्रांची रेलचेल, सोपी भाषा यांचा अवलंब, अत्यल्प किंमत ही या वाचन चळवळीची वैशिष्ट्ये असतील. त्यात वाचन स्पर्धा, गोष्टी सांगणे, लहान मुलांशी संवाद असे कार्यक्रम घेण्यात येतील. नवी मुंबईतील ऐरोली येथील बबन मगदूम पार्थ नॉलेज इन्स्टिट्यूटमध्ये २५ फेब्रुवारीला हा उपक्रम सुरू होईल. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विजया वाड यांनी दिली.

बालसाहित्यिकांची फौज
दादर, भांडुप, विक्रोळी, मुलुंड, ऐरोली या ठिकाणी शाळांमध्ये वाचन उपक्रम राबवला जाईल. या चळवळीत विजया वाड, रमेश खानविलकर, एकनाथ आव्हाड, पूनम राणे, शिल्पा खेर, संगीता चव्हाण, साक्षी परब, ज्योती परब, संजय वाघ, माया धुप्पड अशी बालसाहित्यकारांची फौज सहभागी होईल. 

केवळ मराठी शाळांमध्ये नव्हे; तर इंग्रजी शाळांमध्ये उपक्रम राबवण्याचा माझा मानस आहे. मार्च-एप्रिलमध्ये शाळाबाह्य कार्यक्रमांतर्गत उपक्रम घेण्यात येईल. उपक्रमात सुरुवातीला पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले जाईल.
- विजया वाड, ज्येष्ठ लेखिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Book fair at Mumbai schools