`गंगूबाई काठियावाडी` वास्तवापेक्षा वेगळाच? कोण म्हणतंय असं... 

काजल डांगे
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

`गंगूबाई काठियावाडी` चित्रपटाची निर्मिती करताना विश्वासात न घेतल्याने कुटुंबीयांची नाराजी. चुकीचे चित्रीकरण असल्यास कारवाईचा इशारा गंगूबाई यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

मुंबई : बहुचर्चित `गंगूबाई काठियावाडी`च्या निमित्ताने निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सध्या एका चरित्रपटाची निर्मिती करीत आहेत. मात्र, गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी त्या चित्रपटाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. गंगूबाईंवर चित्रपट बनविताना आम्हाला विश्‍वासात घेतले गेलेले नाही. आमच्याकडून कोणतीही माहिती घेतलेली नाही. गंगूबाईंबद्दल काही चुकीची माहिती दाखविल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे. त्यामुळे या चित्रपटावरून आता वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

हे वाचलं का? : खूशखबर! आता पनवेलवरून थेट गोरेगावपर्यंत लोकल सेवा

`गंगूबाई काठियावाडी` चित्रपटात गंगूबाई यांची भूमिका अभिनेत्री आलिया भट साकारत असून हा चित्रपट हुसैन जैदी यांच्या द माफिया क्वीन ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकात गंगूबाईंबाबत बऱ्याच गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. गुजरातमधून आलेल्या गंगूबाई यांना ५०० रुपयांमध्ये कामाठीपुरात विकण्यात आले. त्यांचे कुख्यात गुंडांबरोबर संबंध होते आणि तिथूनच त्यांचा गुन्हेगारी विश्‍वात दबदबा वाढला, अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये नमूद आहेत. पण हे साफ खोटे आणि चुकीचे असल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. 

धक्कादायक : दोन महिन्यांपूर्वीच त्या कुटुंबानं सगळं संपवलं होतं, घरमालक भाडं घ्यायला आले तेव्हा सगळं समजलं...

गंगूबाईंच्या मानसकन्या बबिता गौडा म्हणाल्या की, आठ वर्षांपूर्वी काही माणसे आमच्याकडे आली. तुमच्या आईवर आधारित पुस्तक काढत आहोत, असे त्यांनी आम्हाला सांगितले. आईवर पुस्तक येतेय म्हणून आम्हाला त्याचा आनंद वाटला; परंतु पुस्तकात चुकीची माहिती असल्याची जाणीव माझ्या मुलाने करून दिली.    

पोस्टरवरील गंगूबाईंचा लूक चुकीचा
गेल्या महिन्यातच चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. पोस्टरवर आलिया परकर आणि कपाळावर लाल रंगाचा टिळा अशा गेटअपमध्ये दिसत आहे. तिच्या बाजूला पिस्तूलही दिसत आहे. पण गंगूबाईंचा पोस्टरवरील लूक चुकीचा असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे मत आहे. बबिता सांगतात, की माझ्या आईच्या कपाळावर कधीच लाल रंगाचा टिळा नव्हता. शिवाय चित्रपटाच्या पोस्टरवर दाखवण्यात आलेले पिस्तूलही आम्हाला पटलेले नाही. तिने आयुष्यामध्ये पिस्तूल हातातही घेतलेले नाही. आमच्या आईला सगळे गंगू माँ म्हणायचे. अनेकांना तिने मदत केली आहे. कुंटणखान्यात अडकलेल्या मुलींना सोडवून त्यांचे लग्न तिने लावून दिले आहे. 

हेही वाचा : अबब... एवढा माेठा मासा जाळ्यात?

गंगूबाई माफिया क्वीन कशा?
कामाठीपुऱ्यातील बाराव्या गल्लीमध्ये गंगूबाई यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यांच्या पुतळ्याची आजही पूजा केली जाते. शिवाय तेथील काही घरांमध्येही गंगूबाई यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. कुंटणखान्यात अडकलेल्या मुलींना मदत करणारी, अनाथांना आसरा देणारी गंगूबाई माफिया क्वीन कशी, असा प्रश्‍न तिचे कुटुंबीय विचारत आहेत.

चित्रपट बनवण्यास आमचा विरोध नाही. माझ्या आजीवर चित्रपट येतोय ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्याआधी संजय लीला भन्साळी यांनी आमची भेट घ्यायला हवी होती. 
- विकास गौडा, गंगूबाईंचा नातू

गंगूबाईंवर भन्साळी चित्रपट बनवत आहेत ही चांगली बाब आहे, परंतु आमच्याकडून माहिती घेणे आवश्‍यक होते. आईबद्दल काही चुकीचे चित्रण असल्यास आम्ही कारवाई करू. 
- बबिता गौडा, गंगूबाईंच्या मानसकन्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of the movie 'Gangubai Kathiawadi' is different. Family members upset