नवी मुंबईच्या विकासाला बुस्टर; प्रकल्पांना गती देण्यासाठी 650 कोटींचा खर्च  

नवी मुंबईच्या विकासाला बुस्टर; प्रकल्पांना गती देण्यासाठी 650 कोटींचा खर्च  

नवी मुंबई : कोरोनामुळे जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे नवी मुंबईतील अनेक महत्त्वाचे प्रकल्प रखडले आहेत. ते पुन्हा जोशाने सुरू करून शहराच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे. यानुसार शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सीसी टीव्ही प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील देण्यात आला आहे. आता जुईनगर रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलासह अमृत योजनेतून साकारणारे टर्शरी ट्रिटमेंट प्लॉट, विजेचे खांब बदलणे, सायन्स पार्क, एनएमएमटीचा बसडेपो आणि वाणिज्य इमारत अशा 650 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची कामे मार्गी लावण्यात येत आहेत. 

हे वाचा : मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही 

नवी मुंबईत कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी रस्ते, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, पदपथ, गटारे, उद्यान, शिक्षण, आरोग्य, मलनिःस्सारण केंद्र आदी पायाभूत सुविधांच्या पुढे जात महापालिकेने काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. यामध्ये सायन्स पार्क, जलतरण तलाव, सेंट्रल पार्क, सीएनडीडी वेस्ट, बायोमिथेन प्रकल्प, कचरा वीज प्रकल्प, घणसोली-ऐरोली जोडणारा उड्डाणपूल, जुईनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल, एनएमएमटी बस डेपोचा विकास, टर्शरी ट्रिटमेंट प्लांट आदींचा समावेश आहे. हे फेरनिविदेच्या फेऱ्यात अडकले. दरम्यानच्या काळात कोरोना आल्यामुळे महापालिकेने सर्व कामे बंद करून फक्त कोरोना रोखण्याकडे लक्ष केंद्रीत केले. तसेच अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट असणाऱ्या प्रकल्पांनाच प्राधान्य देण्याचे निश्‍चित केले. 

महापालिकेच्या या भूमिकेमुळे अंमलबजावणीच्या जवळ आलेले सर्व प्रकल्प अडकले आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे शहराच्या जडण-घडणीकडेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. निविदा प्रक्रियेत अडकलेले आणि प्रक्रियेजवळ पोहोचलेल्या प्रकल्पांना त्यांनी पुन्हा मार्गी लावण्याचा निश्‍चय केला आहे. 

जुईनगर रेल्वे क्रॉसिंग : 
76 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. तो निविदा प्रक्रियेत होता; परंतु कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा सुरू केल्यानंतर कंत्राटदारांसोबत अभियांत्रिकी विभागाची चर्चा सुरू आहे. 

सायन्स पार्क : 
68 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील जागेत असून निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात होणार आहे. यादरम्यान सिडकोला जागेचा भूभाडे भरण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. 

एनएमएमटी बस डेपो विकास : 
150 कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. वाशीतील एनएमएमटीच्या बस डेपोच्या जागेवर बस डेपो आणि अत्याधुनिक वाणिज्य इमारत तयार होत आहे. या इमारतीजवळ फ्लेमिंगो अभयारण्य असल्यामुळे इमारतीच्या उंचीवर वन विभागाने आक्षेप घेतला होता. वन विभागाला महापालिकेतर्फे साडे तीन कोटी रुपये अदा केले जाणार आहेत. लवकरच पालिकेला वन विभागातर्फे ना हरकत दाखला मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. 

सीसी टीव्ही कॅमेरा प्रकल्प : 
154 कोटींच्या खर्चाचा हा प्रकल्प आहे. शहरात सुमारे दीड हजार हाय डेफिनेशन सीसी टीव्ही कॅमेरे लावणे आणि पाच वर्षे देखभाल दुरुस्तीचा प्रकल्प गेली दोन वर्षे रखडला होता. आता या प्रकल्पाला महापालिकेने हिरवा कंदील दाखवला असून प्रत्यक्ष निविदा राबवण्यास सुरुवात झाली आहे. 

टर्शरी ट्रिटमेंट प्लॅंट : 
132 कोटींचा हा प्रकल्प आहे. अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या टर्शरी ट्रिटमेंट प्लॅंटसाठी (प्रक्रियाकृत सांडपाण्यावर पुनःप्रक्रीया करून शुद्ध करणे) कोपरखैरणे आणि ऐरोली येथे अनुक्रमे 20 एमएलडी क्षमता असणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करण्यात येणार आहे. परंतु ऐरोलीचे प्रक्रिया केंद्र खाडीकिनारी असल्याने एमसीआरझेडने हरकत घेतली आहे. उद्या (ता.27) होणाऱ्या बैठकीत तोडगा निघणार असल्याने 132 कोटींचा अडकलेला प्रकल्पही मार्गी लागणार आहे. 

विजेचे खांब बदलणे : 
शहरातील विजेचे अनेक खांब गंजलेले आहेत. त्यामुळे तब्बल 20 हजार खांब 70 कोटी रुपये खर्च करून बदलण्याचा प्रकल्प आहे. तो काही महिने रखडलेला होता. मात्र आता खांब पडण्याच्या घटना लक्षात घेता ते बदलण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. 

कोव्हिडमुळे लॉकडाऊन काळात प्रकल्प रखडल्याने नवी मुंबईची काहीशी पीछेहाट झाली होती; परंतु हे शहर पुन्हा भरारी घेण्यासाठी सज्ज आहे. प्रकल्पांच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरवला जात आहे. हे प्रकल्पांना मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका आयुक्त
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com