तुर्भ्यात होणार बोटॅनिकल गार्डन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल ४८ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध सुविधा देण्याचा संकल्प जाहीर केला आहे...

नवी मुंबई - महापालिकेच्या विक्रमी सुमारे तीन हजार कोटींच्या अर्थसंकल्पात शहरात विविध सुविधा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यंदा तुर्भे येथे बोटॅनिकल गार्डन साकारण्यात येणार असून, नवी आरोग्य केंद्रेही उभारण्याची तरतूद आहे. महापालिकेच्या ईटीसी केंद्रामध्ये प्रतीक्षायादी कमी करण्यासाठी दोन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत.

गार्डनसाठी १७५ कोटी
शहरातील उद्याने अद्ययावत करण्यासाठी उद्यानांचे संवर्धन, उद्यानातील पदपथ, कुंपणभिंतीचा विकास, दिवाबत्ती, खेळणी दुरुस्ती आदी कामांसाठी १७५ कोटी ५३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तुर्भे विभागात एमआयडीसीमार्फत मिळालेल्या ३६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करून बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात येणार आहे. तर सानपाडा सेक्‍टर- १० मधील भूखंड क्रमांक ४१ वर १० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावरील भूखंडावर मानवी पंचेंद्रिये संकल्पनेवर आधारित उद्यान विकसित करणार आहे; तर घणसोलीमध्ये आकर्षित उद्यान तयार करण्यासाठी ३९ हजार १३५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या सेंट्रल पार्कवर तरण तलाव, सायकल ट्रॅक, स्केटिंग पार्क, पाळीव प्राण्यांसाठी पेट झोन, रॉक क्‍लाईबिंग आदी सुविधा उद्यानात असतील.

नवी आरोग्य केंद्रे 
शहराच्या आरोग्य व्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात १२५ कोटी ७७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. करावे गावातील सेक्‍टर- ३८, कुकशेतमधील सेक्‍टर- १४ , कोपरखैरणे, टीटीसी बेल्ट महापे, घणसोली व ऐरोली सेक्‍टर- २० येथे अद्ययावत आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. तुर्भे व कोपरखैरणे माता-बाल संगोपन रुग्णालयांच्या इमारतींची दुरुस्ती, श्‍वाननियंत्रण केंद्र, पशु-पक्षी संग्रहालय, इलेक्‍ट्रिक क्रिमोटोरियम, कत्तलखाना, पशुवैद्यकीय रुग्णालय बांधण्यात येणार आहेत. 

आणखी दोन इटीसी उपकेंद्रे
शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ईटीसी केंद्र सुरू ठेवण्यात येणार असून, विविध सकारात्मक बदल करण्यात येणार आहेत. प्रतीक्षा यादी लक्षात घेत आणखी दोन उपकेंद्रे तयार करण्यात येणार आहेत. ईटीसी सेंटरमध्ये हायड्रोथेरपी कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी क्रीडा संकुल बांधण्यात येणार, त्यांच्या पालकांच्या मृत्युपश्‍चात त्यांचा सांभाळ करण्यासाठी आनंदाश्रम प्रस्तावित करण्यात आले आहे. ईटीसी केंद्राच्या सर्वांगीण विकासासाठी १६ कोटी ३५ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत.

शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन
‘गार्बेज टू गोल्ड’ व ‘वेस्ट टू वेल्थ’ संकल्पनेच्या अनुषंगाने टाकाऊपासून टिकाऊच्या धर्तीवर खतनिर्मिती करणे वा वीजनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने पावले टाकली आहेत. या संदर्भात सुमारे १८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; तर कचरा भरावासाठी २५ कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

सांडपाणी व्यवस्थापनास १२१ कोटी 
शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३३० दशलक्ष लिटर प्रति दिन पाणीपुरवठ्यानंतर २४० दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी ‘एसबीआर’ तंत्रज्ञानावर आधारित मलनिःसारण केंद्र तयार करण्यात येणार आहे. अमृत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारमार्फत ३४७ कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे; तर ७० दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाणी शहरातील उद्योगांना देण्यात येईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. या सर्व योजनांसाठी १२१ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अत्याधुनिक सार्वजनिक विद्युतव्यवस्था
शहरातील विद्युतव्यवस्था अत्याधुनिक करण्यासाठी ‘स्काडा’ प्रणालीचा वापर करून एलईडी दिवे लावण्यात येणार आहेत. घणसोली नोडमध्ये ८२५ पथदिवे लावण्यात येणार आहे. त्याशिवाय दोन हजार ४४५ नवीन फिटिंग, एमआयडीसीत ४८५ नवीन पथदिव्यांचे खांब, वर्दळीच्या ठिकाणी सहा चौकात पथसंकेत आणि मुख्य चौकांमध्ये २५ ठिकाणी हायमास्ट लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ६९ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

शाश्‍वत शिक्षण व्यवस्था उभारणार
शहरातील शिक्षणव्यवस्था अधिक शाश्‍वत होण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले. पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते दहावीच्या वर्गातील अ व ब श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुक्रमे तीन हजार, पाच हजार आणि ६० व ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. शैक्षणिक सहलीसाठी एक कोटी पाच लाखांची तरतूद केली आहे; तर शिक्षण विभागासाठी १३५ कोटी ७५ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत.

कबड्डी, खो-खोसााठी व्यावसायिक संघ
महापालिकेच्या मैदानांमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्‍स ट्रॅक अशा प्रकारच्या खेळांसाठी मैदाने विकसित करणे, कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या आरोग्यासाठी महापालिका मुख्यालयाच्या आवारात हेल्थ क्‍लब, खेळाडू दत्तक योजनेतून कबड्डी, खो-खो व शूटिंग बॉल खेळांसाठी व्यावसायिक संघ तयार करण्याचे प्रस्तावित आहे. तर राजीव गांधी क्रीडा संकुलात नव्याने लॉन टेनिस, बॅडमिंटन, स्पोर्टस्‌ नर्सरी करण्याचे प्रस्तावित आहे. अशा विविध प्रकारासाठी सुमारे ३६ कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद केली आहे.

Web Title: The Botanical Garden will turbha