वडिलांची हत्या करणाऱ्या मुलाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

कोपरखैरणे रेल्वेस्थानकाजवळ मागील रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आलेल्या दानय्या कालिपिली (49) या व्यक्तीची हत्या त्यांचा मुलगा हेमराजू (28) याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

नवी मुंबई : कोपरखैरणे रेल्वेस्थानकाजवळ मागील रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळून आलेल्या दानय्या कालिपिली (49) या व्यक्तीची हत्या त्यांचा मुलगा हेमराजू (28) याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. दारूच्या आहारी गेलेला दानय्या हा दारू पिऊन आल्यानंतर दर दिवशी आईसह भावंडांना मारहाण करून त्यांना विनाकारण त्रास देत असल्याने, या त्रासाला कंटाळून त्यांची हत्या केल्याची कबुली हेमराजू याने दिली. त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांनी हेमराजू याला वडिलांच्या हत्या प्रकरणात अटक केली आहे. 

या घटनेतील मृत दानय्या कालिपिली हा मूळचा आंध्र प्रदेशाचा असून तो पत्नीसह दोन मुले व एक मुलीसह आंध्र प्रदेशातच राहण्यास होता. दानय्या याला अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन आहे. दारू पिऊन आल्यानंतर विनाकारण भांडण काढून तो पत्नीसह मुलांना मारहाण करत असे. दानय्या व त्याचा मोठा मुलगा हेमराजू हे दोघेही वेल्डिंगचे काम करत असल्याने दोन वर्षांपूर्वी हेमराजू हा वडिलांसह नवी मुंबईतील एमआयडीसीमध्ये कामानिमित्त आला होता; मात्र दानय्या हा दिवसभर दारू पिऊन असायचा; तसेच तो कामावर येत नसल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे दानय्या हा पुन्हा आंध्र प्रदेशात गेला होता.

दरम्यान, गत शनिवारी दानय्या हा मुंबईत मित्राकडे आल्याचे समजल्यानंतर हेमराजू याने वडिलांना कोपरखैरणे येथे बोलावून घेतले होते. त्यानुसार दानय्या रात्रीच्या सुमारास आल्यानंतर हेमराजू याने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळ नेऊन लोखंडी रॉड त्यांच्या डोक्‍यात मारून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्या ठिकाणावरून पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दानय्या यांचा मृतदेह सापडल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दानय्या याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

यादरम्यान, सदरचा मृतदेह हा दानय्या याचा असल्याचे एमआयडीसीतील काही कामगारांकडून समजल्यानंतर पोलिसांनी त्याचा मुलगा हेमराजू याला बोलावून घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्यानेच वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी दिली. 

web title : boy arrested for murdering his own father


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: boy arrested for murdering his own father