फडके रोडवरील दिवाळी पहाटची परंपरा खंडित; डोंबिवलीत जमावबंदीचे आदेश

शर्मिला वाळुंज
Thursday, 12 November 2020

अभ्यंगस्नान करून श्री गणेशाचे दर्शन घेऊन दिवाळीचा पहिला दिवस डोंबिवलीतील फडके रोडवर साजरा करण्याची गेल्या कित्येक वर्षाची परंपरा यंदा कोरोनामुळे प्रथमच खंडित होणार आहे.

ठाणे : अभ्यंगस्नान करून श्री गणेशाचे दर्शन घेऊन दिवाळीचा पहिला दिवस डोंबिवलीतील फडके रोडवर साजरा करण्याची गेल्या कित्येक वर्षाची परंपरा यंदा कोरोनामुळे प्रथमच खंडित होणार आहे. डोंबिवलीतील नेहरू रोड, फडके रोड व इतर रस्त्यांवर पोलिसांच्या वतीने जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच दिवाळी पहाटेला कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम फडके रोडवर होणार नाही, येथे गर्दी करू नये या आदेशाचे फलक पोलिसांनी फडके रोडवर लावले आहेत. दिवाळीच्या दिवशीही गणपती मंदिर भाविकांसाठी खुले होणार नसल्याने या परिसरातही गर्दी करू नये, असे मंदिर संस्थानने कळविले आहे. यामुळे यंदा प्रथमच दिवाळी पहाटला डोंबिवलीतील फडके रोड सुना सुना दिसणार आहे. 

दुर्लक्षित पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओघ वळवणार; एमटीडीसीचा खासगी कंपनीबरोबर करार

गेल्या कित्येक वर्षापासून डोंबिवलीतील फडके रोडवर दिवाळी पहाटचा उत्साह अबालवृद्धांच्या उपस्थितीत दिसून येत होता. केवळ डोंबिवलीच नव्हे तर ठाणे, कल्याण व आजूबाजूच्या शहरातील तरुणाईही फडके रोडवर सकाळीच हजर राहायची. डोंबिवलीतील गणेश मंदिरात बाप्पाचे दर्शन घेऊन नंतर मित्र-मैत्रिणींना, आप्तस्वकीयांना भेटून दिवाळी पहाट साजरी केली जाते. यंदा ही परंपरा कोरोनामुळे खंडित होणार आहे. सरकारी निर्णयानुसार मागील आठ महिन्यांपासून गणेश मंदिर बंद आहे. दिवाळीच्या दिवशीही ते खुले होणार नसल्याने मंदिर प्रशासनाने कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन केलेले नाही. दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोड येथे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. शहरात जमावबंदीचे आदेश लागू असून त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन करणारे फलक फडके रोडवरील मदन ठाकरे चौकात लावण्यात आले आहेत. 

 

फडके रोडवरील दिवाळी पहाटचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर फलक पोलिसांनीच लावल्यामुळे नागरिकांना वेगळे आवाहन करण्याचा काही संबंध येत नाही. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गणेश मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन भाविकांना केले जात आहे. 
-राहुल दामले,
अध्यक्ष, 
श्री गणेश मंदिर संस्थान. 

 

रस्ताबंदीचा कोणताही निर्णय नाही. दिवाळी पहाटचा कार्यक्रमच होणार नसल्याने रस्ता बंदी किंवा वाहतुकीत बदलचा काही प्रश्‍न येत नाही. आमच्याकडे तशा मागणीचा प्रस्तावही आलेला नाही. 
- सतेज जाधव,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, 
डोंबिवली शहर वाहतूक शाखा. 

Breaking the tradition of Diwali on Phadke Road Curfew order in Dombivali 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking the tradition of Diwali on Phadke Road Curfew order in Dombivali