अवकाळीने वीटभट्टी व्यवसाय धोक्‍यात

वीटभट्टीसाठी सुरू असलेली तयारी.    (संग्रहित)
वीटभट्टीसाठी सुरू असलेली तयारी. (संग्रहित)

माणगाव (बातमीदार) : बांधकाम क्षेत्राचा कणा असलेला वीटभट्टी व्यवसाय अवकाळी पावसाने संकटात सापडला आहे. नोव्हेंबर महिना सुरू होऊन आठवडा उलटला, तरी जिल्ह्यातील पावसाने उघडीप दिली नाही. परिणामी, भातशेती, कडधान्य शेती, कलिंगड, भाजीपाला शेतीसह तालुक्‍यात महत्त्वाचा असलेला वीटभट्टी व्यवसाय संकटात सापडला आहे. परिणामी, आदिवासी कामगारांच्या रोजगारावरही संकटात आला आहे.

तालुक्‍यात लहान मोठे व्यवसायिक, शेतकरी शेतातील मातीचा उपयोग करून वीटभट्टी व्यवसाय करतात. बांधकाम क्षेत्रासाठी आवश्‍यक असणाऱ्या बहुतांश विटांचा पुरवठा तालुक्‍यातूनच होतो. काही लाखांत गुंतवणूक असलेला हा व्यवसाय वीटभट्टी व्यावसायिक व कामगारांना चांगला आर्थिक लाभ मिळवून देतो. प्रतिवर्षी ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या थंडीच्या हंगामापासून अनेक ठिकाणी वीट व्यावसायिक आदिवासी कामगारांच्या मदतीने विटा पाडायला सुरुवात करतात. यावर्षी मात्र नोव्हेंबर महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरी पावसाळा सुरू आहे. परिणामी, या व्यवसायासाठी आवश्‍यक असणारी पूर्वतयारी करणे अवघड झाले आहे. शेतात पाणी साचले आहे. गवत, मालरान ओले असल्याने ट्रॅक्‍टर जाऊ शकत नाहीत. अशा अनेक अडचणी असल्याने वीट व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

तालुक्‍यातील बहुतांशी वीट व्यावसायिक आदल्या वर्षीच पुढील वर्षाची तयारी करतात. माती जमा करून ठेवतात. मजूर नक्की करून त्यांना आगाऊ रक्कम देतात. या सर्व तयारीत काही लाखांची रक्कम त्यांना गुंतवावी लागते. उन्हाळा वाढल्यानंतर या व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे अनेक व्यावसायिक मार्चपूर्वीच जास्तीत जास्त वीट तयार करून त्या भट्टीत तयार करतात. या वर्षी मात्र नोव्हेबर संपेल तरी वीटभट्टी व्यवसाय सुरू होऊ शकत नसल्याचे अनेक व्यावसायिक सांगतात. 

आदिवासी कामगारांना या व्यवसायात मोठी मागणी असते. अनेक कामगार अगोदरच आगाऊ रक्कम घेऊन नक्की झालेले असतात. या व्यवसायातून चांगला रोजगार व आर्थिक लाभ त्यांना मिळतो. या वर्षी मात्र सुरुवातीचे दोन महिने पावसामुळे वाया गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा रोजगार उपलब्ध नाही. काही कुशल कारागीर व कुटुंबीयांना या पावसाचा जबर फटका बसला असून रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वीट तयार करण्याची प्रक्रिया
वीटभट्टीसाठी साधारणपणे आठ ते १० जणांचा एक पाटला असतो. तीन महिन्यांत दीड ते पावणेदोन लाख एवढी वीट एक पाटला तयार करतो. अडीच ते तीन हजार रुपये एक हजार विटेला मजुरी लागते. सध्या बाजारात एक हजार वीट चार ते साडेचार हजार आणि ठोकला वीट आठ हजार रुपये प्रति हजारी आहे. साधारणपणे एक व्यावसायिक तीन ते चार लाख प्रतिवर्षी वीट पाडतात. यातून खर्च वजा जाता एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळते.

दरवर्षी ऑक्‍टोबरपासून वीटभट्टी हंगाम सुरू होतो. सुरुवातीची साफसफाई व माती जमा करण्याची कामे, खला करण्याची कामे ऑक्‍टोबरमध्ये पूर्ण झाल्यावर नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वीट तयार होण्यास सुरुवात केली जाते. या वर्षी मात्र लांबलेल्या पावसाने सर्वच कामे अपूर्ण आहेत. कामगार आणि बाकीची तयारी पूर्ण झाली आहे; मात्र पावसामुळे काहीही करता येत नाही. 
- कृष्णा पेणकर, वीट व्यावसायिक, माणगाव

या महिन्यात वीट पाडायला सुरुवात करतो. या व्यवसायामुळे हमखास पाच महिन्यांचा रोजगार मिळतो. रोजगारासाठी कोठे फिरावे लागत नाही. यावर्षी सततच्या पावसामुळे मात्र हमखास मिळणारा रोजगार बुडाला आहे.
- चंदर वाघमारे, वीटभट्टी कामगार, माणगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com