पेव्हर ब्लॉकमुळेच पूल पडला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

मुंबई - गोखले पुलाच्या पादचारी मार्गिका अतिरिक्त केबल्स, पेव्हर ब्लॉक तसेच रेतीमुळे कोसळली असल्याचा निष्कर्ष रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवालात काढला आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह इतर संबंधितांना दोषी ठरवण्यात आले आहे. पुलावर केबल्स टाकण्याची परवानगी महापालिकेने दिली असल्याने पालिकेचे अधिकारीही यात गुंतण्याची शक्‍यता आहे.

३ जुलै रोजी गोखले पुलाची मार्गिका कोसळून पाच जण जखमी झाले होते. त्यातील उपचार सुरू असताना अस्मिता काटकर या महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच पश्‍चिम रेल्वे दिवसभर ठप्प पडली होती. मार्गिकेखालील अतिरिक्त केबल्स आणि पेव्हर ब्लॉकच्या वजनामुळेच ही दुर्घटना घडली असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने ५ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते.

रेल्वेसुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांच्या अहवालाने या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. मार्गिकेवरील केबल्स, पेव्हर ब्लॉक तसेच रेतीच्या भाराने हा पूल पडला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. कॉण्टिलिव्हर पद्धतीची ही मार्गिका बांधताना अतिरिक्त भाराचा विचारच करण्यात आला नव्हता. असा ठपका ठेवत पुलाच्या डिझाईनवरच अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्यात आला आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर पियुष गोयल यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. 

त्यानुसार ही चौकशी करण्यात आली आहे. या अपघाताचा ठपका रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. तसेच अहवालात इतरही दोषी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे या पुलावर केबल्स टाकण्याची परवानगी महापालिकेने दिली असल्याने पालिकेचे अधिकारीही यात अडकण्याची शक्‍यता आहे.

लिखित करार करा
एखाद्या घटनेनंतर पालिका व रेल्वे एकमेकांकडे बोट दाखवतात. त्यामुळे रेल्वे व पालिकेची हद्द कोणती याच्‍या जबाबदारीसाठी लिखित करार आवश्‍‍यक असल्‍याचे सुरक्षा आयुक्तांनी म्‍हटले.

निलंबनाची टांगती तलवार
या घटनेत ऑडिटदरम्यान निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Web Title: bridge colapse by paver block