काळ नदीवरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

महाड तालुक्‍यातील वाळण विभागातील दापोली व पणदेरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काळ नदीवरील पूल धोकादायक झाला

मुंबई : तालुक्‍यातील वाळण विभागातील दापोली व पणदेरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काळ नदीवरील पूल धोकादायक झाला असून, कमी उंचीच्या या पुलावरून पावसाळ्यात कायम पाणी जात असल्याने गावांचा संपर्क तुटत असतो. शाळा, शेती, नोकरी-व्यवसाय याला सुटी देत ग्रामस्थांना पुलावरून पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागत असते. या ठिकाणी नवा उंच पूल बांधावा, या मागणीच्या पूर्ततेसाठीही ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

महाड तालुक्‍यातील बिरवाडी मार्गे वाळण विभागात जाताना पणदेरी गावाकडे जाणाऱ्या पंतप्रधान सडक योजनेतील जोडरस्त्यावर काळ नदी लागते. रायगडाच्या पायथ्याच्या परिसरात वसलेल्या या दुर्गम भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. यामुळे काळ नदीला पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो. मोठा पाऊस आला की पुलावरून पाणी जाते. यामुळे परिसरातील पणदेरी, दापोली, दापोलीपाडा या गावांचा संपर्क तुटतो.

पुलाच्या एका टोकाला काळ नदीच्या पाण्याने वाट काढली असल्याने रस्ता निघून गेला आहे, तर पूलही खचला असल्याने धोकादायक झाला आहे. वारंवार होणाऱ्या या गैरसोईमुळे हा पूल नवीन बांधून मिळावा या ग्रामस्थांच्या मागणीला बगल देण्याचे काम प्रशासनाने केलेच; शिवाय पालकमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनीही मागणीचा सकारात्मक विचार केला नसल्याने या वर्षी पावसाळ्यात काळ नदीचा सामना करत जीव मुठीत घेऊन पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

या ठिकाणी पूल बांधण्याबाबत प्रस्ताव तयार केला असून, तो मंजुरीसाठी पाठवलेला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर काम होईल. 
- एस. बी. जगताप, कनिष्ठ अभियंता, जि.प. बांधकाम विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Bridge of kal River is dangerous for transport, near Mumbai