ठाण्यात खोदकामात पुन्हा आढळले ब्रिटिशकालीन रेल्वे रूळ 

खोदकामादरम्यान आढळलेले रेल्वे रुळ
खोदकामादरम्यान आढळलेले रेल्वे रुळ

ठाणे : ठाणे पूर्वेकडील कोपरी परिसरात "ठाणे स्मार्ट सिटी' अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिस- 2 (ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प) या प्रकल्पाच्या खोदकामात रस्त्याखाली ब्रिटिशकालीन रेल्वे रूळ सापडल्याने "स्मार्ट सिटी'च्या कामाला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत. याआधी वर्षभरापूर्वी मीठबंदर रोडवर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्याखालीदेखील अशाच प्रकारे रेल्वे रूळ आढळल्याने काम रोखण्यात आले होते; मात्र आता रेल्वेच्या या प्राचीन पाऊलखुणा दिसत असूनही रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतलेली दिसत नाही. याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांना विचारले असता त्यांनी उप जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्देश करून माहिती देणे टाळले. 

ठाणे पश्‍चिमेकडील सॅटिसच्या धर्तीवर पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात सॅटिस- 2 हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. रेल्वेची जागा असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पासाठी पाठपुरावा सुरू होता. ठाणे महापालिका, राज्य सरकार आणि मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या या प्रकल्पाच्या प्राथमिक कामासाठी जागोजागी बॅरिकेड्‌स उभारून रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे.

कोपरीतील टीएमटी बस स्थानकावरील पवनसुत हनुमान मंदिरानजीक स्कायवॉकखालीदेखील रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे. या रस्त्याखाली ब्रिटिशकालीन लोहमार्ग आढळल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळे आले आहेत. हे रेल्वे रूळ काढून टाकण्यासाठी प्रकल्पाच्या ठेकेदाराने अद्याप रेल्वे प्रशासनाशी कुठलाही संपर्क साधला नसून रेल्वेनेदेखील आपल्या या अनमोल ठेव्याची पाहणी केलेली नाही. 

दरम्यान, खोदकामात सापडलेल्या या लोहमार्गाची तपासणी ठाणे महापलिकेच्या अभियंत्यांनी केली असली, तरी अद्याप ठेकेदारास काम थांबवण्याचे निर्देश दिलेले नाहीत. याबाबत पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

जुन्या पाऊलखुणांचा प्रश्‍न ऐरणीवर... 
भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये वाडीबंदर ते ठाणे अशी धावली. ठाणे पूर्वेकडील भागात रेल्वेच्या भव्य यार्डात रेल्वे वाघिणीतून दगडी कोळसा, चुनखडी, मार्बल, लाद्या आदी माल उतरत असे. याशिवाय पूर्वेकडील खाडीकिनारी (आताचा विसर्जन घाट) कस्टम जेटी आणि बंदर होते. तसेच या परिसरात विस्तीर्ण खाडीत पसरलेली मिठागरे असल्याने मालगाडीच्या डब्यातून मीठ व इतर वस्तूंची ने-आण व्हायची; मात्र काळाच्या ओघात मिठागरे गेली, मालवाहतूकही बंद पडली अन्‌ विकासाच्या नावाखाली रेल्वेच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जमिनीखाली गाडून भव्य रस्ते उभारण्यात आले. या रस्त्यांच्या खोदकामात रस्त्याखाली लांबच लांब लोहमार्ग आढळला आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या जुन्या पाऊलखुणांचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

सॅटिस- 2 प्रकल्प काय आहे? 
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर उभारण्यात येत असलेल्या सॅटिस (पूर्व) या प्रकल्पांतर्गत 3 कि.मी. लांबीचा एलिव्हेटेड मार्ग बांधण्यात येणार असून ठाणे रेल्वे स्थानक (पूर्व) ते द्रुतगती मार्गास थेट जोडण्याबरोबरच नवीन प्रस्तावित उपनगरीय स्थानकाला हा पूल जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर तेथील मोकळ्या 8912 चौरस मीटर जागेवर 6.50 मीटरचा डेक बांधण्यात येणार असून सदर डेक पादचारी पुलासोबत जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर या डेकवर सार्वजनिक वाहतुकीचा बस थांबाही ठेवण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com