
मुंबई : कोरोनावर उपयुक्त लस येण्याचे संकेत मिळत असून लसीचा साठा करण्यासाठी कांजूर येथील पालिकेच्या इमारतीतील तीन मजले आरक्षित केले आहेत. तर पालिकेच्या केईएम रुग्णालयात कोल्ड स्टोरेज रुम तयार करण्यात आली असून नियंत्रित तापमान असणारी ही रुम लसीसाठी सज्ज असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. सरकारने दिलेल्या निर्देशानुसार लसीकरणाचा पहिला टप्पा गाठण्यासाठी पालिकेची सर्व रुग्णालये कोल्ड स्टोरेजने सुसज्ज केली जात आहेत. त्यानुसार, उणे 20 अंश सेल्सियसपर्यंत लस साठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
8 विभागाचे होणार रुपांतर-
KEM रुग्णालयात साधारणत: 8 विभाग आहेत जिथे कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहे. केईएममध्ये आधीपासून असलेल्या विभागाचे रुपांतरण करण्यात येणार आहे. ज्यात लसीच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. पाॅवर बॅकअपसाठी युपीएस बॅटरीही ठेवली जाणार आहे. किमान 8 ते 10 हजार लसीच्या कुप्या ठेवल्या जातील अशी सुविधा केली जाणार आहे.
कोरोना लसीचा साठा कांजूर येथे पालिकेच्या इमारतीत करण्यात येणार आहे. तर लस उपलब्ध झाल्यानंतर पहिली लस केईएम रुग्णालयात देण्याबाबत विचार सुरु असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, केईएम हॉस्पिटलमध्ये वैशिष्यपूर्ण रेफ्रिजरेटरसह कोल्ड स्टोरेज रुम तयार करण्यात आला आहे. कोविड लसीसाठी आवश्यक असणारं नियंत्रीत तापमानाची कोल्ड स्टोरेज रुम असणार आहे. प्रत्येक रेफ्रिजरेटरला तापमान नियंत्रक रिमोट आणि मॉनिटर असणार आहे. विशेष म्हणजे वीजपुरवठा सुरळीत राखण्यासाठी पॉवर बॅकअप सिस्टम सक्रीय असणार आहे. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठराविक व्यक्तींनाच कोल्ड स्टोरेज रुममध्ये प्रवेश दिला जाईल, असेही डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले आहे. तर, गरजेनुसार लसीच्या साठवणूकीसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमता वाढवण्यात येईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले.
युकेमध्ये केलेल्या ऑक्सफर्ड लसीच्या क्लिनिकल ट्रायलचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. ती लस 70 टक्के कार्यक्षम असल्याचे ही सांगण्यात आले आहे. हा अंतर्गत अहवाल असून तिची सुरक्षा आणि कार्यक्षमता ही चांगली असल्याचे समजतंय. त्यानुसार, जर कोणतीही लस आपल्याला उपलब्ध झाली तर त्यासाठी आपण तयारी सुरु केली असून किमान 8 ते 10 हजार लसीच्या कुप्प्या ठेवण्याची सुविधा आपल्याकडे आहे असं KEM चे अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख म्हणालेत.
Bruhanmumbai Municipal Corporation all set for the first phase of corona vaccine
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.