2019 घोषणा एक्‍स्प्रेस! 

2019 घोषणा एक्‍स्प्रेस! 

नवी मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी रविवारी मुंबईतील लोकलमधील श्‍वास कोंडणाऱ्या गर्दीत, अनेकदा पायाच्या तळव्यांच्याच आधारे उभे राहून ऑफिसमधील मस्टर गाठण्याची कसरत करणाऱ्या प्रवाशांसाठी "घोषणारूपी एक्‍स्प्रेस' चालवली. प्रत्येक मुंबईकर लवकरच वातानुकूलित (एसी) लोकलने प्रवास करताना दिसेल, त्यासाठी 200 वातानुकूलित (एसी) लोकल खरेदी करण्यात येतील, असे गारेगार स्वप्न दाखवत निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला खरा; पण मुंबई उपनगरी सेवेचे "व्यस्त' वास्तव पाहता, हे "दिवास्वप्न'च ठरणार का, असा प्रश्‍न लाखो प्रवाशांना पडला. मुंबईच्या रेल्वे सेवेसाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या 62 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी मिळाली असल्याने विकासाला गती मिळेल, अशी पुस्तीही गोयल यांनी या वेळी जोडली. 

मुंबईत धावणाऱ्या एसी लोकलना मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईसाठी लवकरच अशा आणखी दोनशे लोकल खरेदी करण्यात येतील. त्यासाठी येणाऱ्या 54 हजार कोटींच्या खर्चाचा भार केंद्र तसेच राज्य सरकार भागीदारीत उचलतील, असे गोयल म्हणाले. पनवेल येथे रेल्वे कोच निर्मितीचा कारखाना उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. पहिल्या टप्प्यातील 40 लोकलच्या खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

सिडको आणि रेल्वेच्या भागीदारीतून दक्षिण नवी मुंबईत साकारलेल्या नेरूळ-खारकोपर लोकल सेवेला हिरवा कंदील दर्शवण्यासाठी ते नवी मुंबईत आले होते. 

स्वप्न वास्तवात येणार? 
सध्या मुंबईतील उपनगरी मार्गावर लोकलचे 222 रेक चालवण्यात येतात. त्यापैकी 101 रेक पश्‍चिम रेल्वेवर, तर 121 रेक मध्य रेल्वेवर धावतात. या दोन्ही मार्गांवर दिवसभरात लोकलच्या एकूण 3137 फेऱ्या होतात. (पश्‍चिम रेल्वे ः 1365, मध्य रेल्वे ः 1772). पश्‍चिम रेल्वेवर एसी लोकलची एक रेक चालवण्यात येते. तिन्ही मार्गांच्या लोकलच्या वेळापत्रकावर नजर टाकल्यास सरासरी तीन मिनिटांनी एक लोकल धावते, असे दिसते. रेल्वे मंत्र्यांच्या आश्‍वासनानुसार भविष्यात मुंबईतील रुळांवर खरोखरच नव्या 200 एसी लोकल धावल्यास या लोकलच्या दरवाजांची उघडझाप होण्यास लागणारा वेळ पाहता ही सरासरी पाळली जाईल का, हा प्रश्‍न उरतोच. वाटेत लागणारे सिग्नल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांचा विचार केल्यास ती आणखी घटू शकेल, असे जाणकारांचे मत आहे. 

पेण-पनवेल मेमू अखेर धावली 
पेण ः अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या पेण-पनवेल या मेमू सेवेला रविवारी सुरुवात झाली. नेरूळ-खारकोपर लोकल सेवेच्या उद्‌घाटन सोहळ्यात रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ लिंकने याही सेवेचे लोकार्पण केले. दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनी पेणहून सुटलेली पहिली मेमू दुपारी 1.30च्या सुमारास पनवेल स्थानकात पोचली. पहिल्या दिवशी मोफत प्रवासाची मुभा असल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com