येऊरला जाणाऱ्या मद्यपींना दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

ठाणे शहरालगत असलेल्या निसर्गरम्य येऊरमध्ये पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यपींवर पोलिसांचा वॉच सुरू असताना बंदी असतानाही गटारीनिमित्त येऊरला जाणाऱ्या २७ जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.

ठाणे : ठाणे शहरालगत असलेल्या निसर्गरम्य येऊरमध्ये पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यपींवर पोलिसांचा वॉच सुरू असताना बंदी असतानाही गटारीनिमित्त येऊरला जाणाऱ्या २७ जणांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी येऊरच्या प्रवेशद्वाराची नाकाबंदी करून वाहनांची कडेकोट तपासणी केली. 

येऊर परिसरात बेकायदा सुरू असलेल्या ढाबे, हॉटेल्समधून मद्याची विक्री सर्रास होत असते. तेव्हा, गटारीच्या पार्श्वभूमीवर येऊरला जाणाऱ्या पर्यटकांवर वर्तकनगर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. त्याचबरोबर, मद्य प्राशन करून वाहने हाकणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होती. आठवडाभरात येऊर क्षेत्रात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या १५ जणांवर, अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर; तर दारू पिऊन वाहने हाकणाऱ्या ११ जणांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह’अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. 

गटारीनिमित्त अनेक जण येऊरसारख्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी येत असतात. निसर्ग पर्यटनाला आक्षेप नाही; मात्र मद्यपींना प्रतिबंध करण्यासाठी; तसेच येऊरमधील पशू-पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका पोहोचू नये यासाठी गटारीच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम आखून कारवाई करण्यात आली.
- प्रदीप गिरधर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वर्तकनगर पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bumper for incoming alcoholics