‘बर्निंग ट्रक’चा भर रस्त्यात थरार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आच्छाड काजळी गावाजवळील प्रकार. 

तलासरी ः मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील आच्छाड काजळी गावाजवळ प्लायवूड घेऊन जाणाऱ्या ट्रकला मंगळवारी रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत ट्रकसह प्लायवूड जळून लाखोंचे नुकसान झाले आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला लागलेल्या आगीमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती; मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ उंबरगाव, सरीगाव, वापी येथील अग्निशमन दलाला पाचारण करत आग आटोक्‍यात आणली. गुजरातवरून प्लायवूड भरून निघालेला ट्रक मुंबईकडे जात असताना अच्छाड काजळी येथे पोचल्यानंतर ट्रकला अचानक आग लागली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी महामार्गाशेजारी ट्रक उभा करून आगीवर नियंत्रण मिळविले; परंतु ट्रक आणि प्लायवूड जळून लाखोंचे नुकसान झाले. 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वारंवार वाहनांना आग लागणे, अपघात होणे अशा घटना होतात; परंतु महामार्गावर आग विझवण्यासाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा नसल्याने मोठे नुकसान होऊन जीवितहानी होत आहे. महामार्गावरील अपघाताची संख्या पाहता महामार्गावर अग्निशमन यंत्रणा आणि अपघातात जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटर आवश्‍यक आहे; परंतु लाखोंची टोल वसुली करूनही आवश्‍यक सुविधा पुरवण्याकडे पाठ फिरवली जात असल्याने प्रवाशांचा नाहक बळी जात आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.

हे ही वाचा...दाऊदला तुडवणारा करीम लाला होता तरी कोण?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: burning truck on mumbai-ahmadabad highway