राणीच्या बागेतल्या पक्ष्यांवर आता २४ तास असेल करडी नजर

समीर सुर्वे
Wednesday, 13 January 2021

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पक्ष्यांवर 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे.

मुंबई: बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर भायखळा येथील जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पक्ष्यांवर 24 तास नजर ठेवण्यात येणार आहे. या पक्ष्यांची देखभाल करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही पक्ष्यांजवळ जाण्यापूर्वी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

कानपुर येथील प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांना बर्ड फ्लूची बाधा झाल्याची शक्यता आहे. मात्र या प्राणीसंग्रहालयात खुला तलाव असल्याने तेथे स्थालांतरित पक्षी येतात. त्यामुळे बर्ड फ्लू प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता आहे. भायखळा प्राणीसंग्रहालयातील पक्ष्यांना अशा प्रकारे बाधा होण्याची शक्यता आहे. या पक्ष्यांचा बाहेरील पक्ष्यांशी संपर्क येत नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून सूचना आल्या असून त्यानुसार अंमलबजावणी सुरु आहे, असेही सांगण्यात आले.

प्राणीसंग्रहालयातील प्रत्येक पक्ष्यांवर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच त्यांचे निवारेही नियमित स्वच्छ ठेवण्यात येत आहे. निवाऱ्यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण केले जात आहे, असे प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले. पक्ष्यांच्या निवाऱ्यात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही विशेष काळजी घेण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. पक्ष्यांच्या पिंजऱ्यात निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचेही योग्य प्रकारे निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे सांगण्यात आले.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भायखळ्याच्या प्राणीसंग्रहालयात 200 पक्षी असून यात पाणपक्षी, विदेशी पक्षी तसेच काही दुर्मिळ पक्षांचाही समावेश आहे. राणीच्या बागेतील पक्षांच्या दालनातून पर्यंटकांना फिरता येते. अशा पद्धतीचे बनविण्यात आले आहे. देशातील अशा प्रकारेचे हे पहिलेच प्राणीसंग्रहालय आहे.
 
वाघाचे दर्शन लांबणीवर

कोविडमुळे पर्यटकांना राणीच्या बागेत प्रवेश दिला जात नाही. आता कोविड नियंत्रणात आल्यावर पर्यटकांना प्रवेश देण्याचा विचार महानगर पालिका करत आहे. त्यासाठी राज्य सरकारकडेही पाठपुरावा केला जाणार होता. आता बर्ड फ्लूमुळे पर्यटकांना प्रवेश देणे शक्य नाही. लॉकडाऊनपूर्वी राणीच्या बागेत औरंगाबादवरुन वाघाची जोडी आणण्यात आली होती. मात्र, कोविडमुळे प्राणीसंग्रहालय बंद असल्याने हे वाघ अद्याप पर्यटकांना पाहाता आले नव्हते. आता त्यांचेही दर्शन लांबणार आहे.

हेही वाचा- कोविशिल्ड कलयुगातील संजीवनी मुंबईत दाखल: महापौर किशोरी पेडणेकर

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Byculla Jijabai Bhosale Park monitored 24 hours bird flu Birds


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Byculla Jijabai Bhosale Park monitored 24 hours bird flu Birds