मुंबई लोकल सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं सावध पाऊल, मंत्र्यानं दिली 'ही' महत्त्वाची माहिती

पूजा विचारे
Tuesday, 1 September 2020

लोकल सेवा किंवा धार्मिक स्थळं अशा सर्वच गोष्टी पुन्हा सुरु  करण्यासाठी नियमावली (SOP) तयार केली जात आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

मुंबईः राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. पुढच्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत राज्य सरकारनं लॉज आणि हॉटेल १०० टक्के क्षमतेनं सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, इतर रेस्टॉरंट बंदच राहणार आहेत. आंतरजिल्हा प्रवासासाठीचा ई-पास रद्द करण्यात आला असून खासगी बसेसना परवानगी देण्यात आलीय. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र  मेट्रो, रेल्वे सेवा बंदच असणार आहे. तसंच रेस्टॉरंट आणि बार,नाट्य आणि सिनेमागृह,जिम, स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे,  सामाजिक, राजकीय, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदीच असणार आहे. 

दरम्यान केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सनुसार मुंबई मेट्रो ७ सप्टेंबरपासून सुरु करण्यास परवानगी दिली. त्यामुळे राज्य सरकारही मुंबई मेट्रो सुरु करण्यास परवानगी देईल अशी आशा होती. मात्र सरकारनं हा निर्णय अद्यापही अनिर्णित ठेवला आहे. तसंच लोकलबाबतही सरकारनं काहीच निर्णय घेतलेला नाही. याच पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

हेही वाचाः  'अॅड आंबेडकरांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल', शिवसेनेचा टोला

लोकल सेवा किंवा धार्मिक स्थळं अशा सर्वच गोष्टी पुन्हा सुरु  करण्यासाठी नियमावली (SOP) तयार केली जात आहे. त्यामुळे त्यानुसारचं निर्णय घेण्याचं काम सुरु असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अजूनही कोरोनाचं संकट कमी झालेलं नाही आहे. त्यामुळे अचानक गर्दी झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आवश्यक ती खबरदारी घेत असून एक एक गोष्ट पूर्ववत करत असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

अधिक वाचाः  आरोग्योत्सव! लालबाग गणेशोत्सव मंडळांच्या शिबिरात दुप्पट प्लाझ्मा दान; 246 कोरोनामुक्त भक्तांचा शिबिराला प्रतिसाद

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव दरम्यान आरोग्य उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात प्लाझ्मादान करणाऱ्या २४६ जणांचा फुलांचा वर्षाव करून शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना शिंदे यांनी ही माहिती दिली. 

मंदिरे खुली करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यावर सरकार घाईघाईत निर्णय घेणार नसल्याचं चित्र दिसतंय.  राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वच निर्णय सावधपणे घेत आहेत.

Cabinet Minister Eknath Shinde React on Mumbai Local and temple Reopen


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet Minister Eknath Shinde React on Mumbai Local and temple Reopen