Mumbai : महाराष्ट्रात सर्वांत उंच केबल पुलाची उभारणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

Mumbai : महाराष्ट्रात सर्वांत उंच केबल पुलाची उभारणी

मुंबई : देशातील सर्वांत उंच केबल-स्टेड रोड पूल महाराष्ट्रात बांधला जात आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत या १३२ मीटर उंच पुलाचे बांधकाम सुरू आहे. सध्याच्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतची लांबी सुमारे १९ किलोमीटर आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करेल आणि द्रुतगती मार्गाचे अंतर सहा किलोमीटरपेक्षा कमी करणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ २५ मिनिटांपेक्षा कमी होईल.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक प्रकल्प दोन पॅकेजमध्ये विभागलेला आहे. त्यापैकी अफकॉन्स ही कंपनी पॅकेज दोनचे काम करत आहे. यात द्रुतगती मार्गाचे सहा मार्गिकेवरून आठ मार्गिकेपर्यंत रुंदीकरण, दोन उड्डाणपूल, त्यातील एक केबल-स्टेड पूल, यासह इतर कामांचा समावेश आहे. सध्या ८५० मीटर लांबीच्या पुलाच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. केबल-स्टेड पुलाची लांबी ६५० मीटर एवढी आहे. हा पूल जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर असेल, जो देशातील कोणत्याही महामार्ग प्रकल्पामधील सर्वांत उंच केबल पूल असेल.

रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग आव्हानात्मक

प्रकल्पाला विविध भूवैज्ञानिक, वाहतूक आणि अभियांत्रिकी आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. सध्याच्या द्रुतगती मार्गाचे सहा मार्गिकेवरून आठ मार्गिकेपर्यंत रुंदीकरण करण्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये टेकडी तोडण्यासाठी ब्लास्टिंग करावे लागते. ब्लास्टिंगदरम्यान केवळ वाहतूकच नाही, तर ब्लास्टिंग ठिकाणांजवळील कामदेखील थांबवले जाते. मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री ब्लास्टिंग प्रभाव क्षेत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलवली जाते. सामग्रीची वाहतूक आणि गर्डरचे स्थलांतर हेदेखील आव्हानात्मक आहे.

प्रकल्पाच्या पॅकेज दोनची वैशिष्ट्ये

५.८६ किमी

द्रुतगती मार्गाचे रुंदीकरण

१०.२ किमी

ॲप्रोच रस्त्यांचे बांधकाम

१३२ मीटर

केबल-स्टेड पुलाची उंची

८२ मीटर

सर्वांत उंच खांब

६५० मीटर लांबी