केबलचालकांना ‘ट्राय’चा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नव्या केबल दरांची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्यामुळे केबलचालक आणि ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या कालावधीत सेवा पुरवठादारांनी ग्राहकांचे प्रबोधन करावे, असे आदेश ट्रायने दिले आहेत.

मुंबई - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) नव्या केबल दरांची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्यामुळे केबलचालक आणि ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या कालावधीत सेवा पुरवठादारांनी ग्राहकांचे प्रबोधन करावे, असे आदेश ट्रायने दिले आहेत.

ट्रायने ठरवलेल्या नव्या केबल दरांना केबलचालकांनी विरोध केला असून, ग्राहकांमध्येही गोंधळाचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. २७) रात्री उशिरा ट्रायची बैठक झाली. त्यानंतर ट्रायचे सल्लागार अरविंद कुमार यांनी नव्या केबल दरांची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. सध्याचे केबल दर ३१ जानेवारीपर्यंत कायम राहतील. नवी दर प्रणाली न स्वीकारल्यामुळे केबल ऑपरेटर व ग्राहकांची सेवा २९ डिसेंबरनंतर पुरवठादारांनी खंडित करू नये, असे या आदेशात म्हटले आहे. 

जुन्या आदेशानुसार केबल दर प्रणाली २९ डिसेंबरपासून लागू होणार होती, त्या दिवसापर्यंत नवी दर प्रणाली न स्वीकारणाऱ्या ग्राहकांची केबल सेवा बंद पडेल, असे संदेश समाजमाध्यमांवरून येत होते. ग्राहकांना नवी दर प्रणाली व वाहिन्यांच्या नव्या पॅकेजची सविस्तर माहिती महिनाभर आधी मिळण्याची अपेक्षा असताना केवळ काही दिवस आधी मिळाल्यामुळे संभ्रम होता.

ट्रायने आधी घेतलेल्या बैठकीत नव्या नियमावलीच्या अंमलबजावणीला सेवा पुरवठादारांची तयारी असल्याचे दिसून आले. वाहिन्यांची निवड करण्याचे ग्राहकांचे काम मंद गतीने होत आहे. त्यांना पुरेशी माहिती मिळाली नाही, असे सांगण्यात आले. देशात १५ कोटी केबल टीव्हीचे ग्राहक आहेत; त्यांना माहिती देण्यासाठी मुदत मिळावी, अशी मागणी पुढे आली होती.

Web Title: Cable Owner Agitation Trai