esakal | बारावीची परीक्षा रद्द करून पर्यायी मार्ग शोधा!
sakal

बोलून बातमी शोधा

बारावीची परीक्षा रद्द करून पर्यायी मार्ग शोधा!

शिक्षण मंडळाकडून पहिली ते अकरावीच्या परिक्षा रद्द

बारावीची परीक्षा रद्द करून पर्यायी मार्ग शोधा!

sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती ही अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. राज्यातील कोरोनाच्या साखळीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. ही परिस्थिती पुढील काही महिने तरी आटोक्यात येईल असे दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आधी शिक्षण बोर्डाने पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा न घेता पुढील वर्गात पाठवलं होतं. काही दिवसांनी दहावीची परिक्षा रद्द करण्यात आली. मात्र बारावीची परिक्षा होणारच असं बोर्डाकडून ठणकावून सांगितलं जातंय. अशा परिस्थितीत बारावीची पुढील महिन्यात घेण्यात येणारी परीक्षा रद्द करून त्याऐवजी इतर वेगळ्या पर्यायांची परीक्षा घ्यावी आणि त्यासाठी मार्ग शाधावेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालक संघटनांनी केली आहे.

हेही वाचा: दहावी परीक्षा रद्द; फी परत मिळणार का?

मागील आठवड्यात सरकारने दहावीची परीक्षा रद्द करून त्यासाठी अंतर्गत मुल्यमापन आणि इतर पर्याय देत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर आता बारावीची परीक्षाही रद्द केली जावी अशी मागणी इंडिया वाईड पेरेंट असोसिएशनच्या ॲड. अनुभा सहाय यांनी केली आहे. राज्यात केवळ मुंबईच नाही तर ग्रामीण भागातील परिस्थितीही भयंकर बनली आहे. कोरोनामुळे सध्या बारावीच्या परीक्षेची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातही मोठ्या प्रमाणात नकारात्मक वातावरण निर्माण झालेले आहे. अशा वेळी त्यांच्या परीक्षा कशा होतील ही भीती आहे. त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी बारावीची परीक्षा रद्द करावी आणि त्यासाठी पर्यायी अशी ऑनलाईन परीक्षा, अथवा अंतर्गत मुल्यमापन करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जावे अशी मागणी मागासवर्गीय विद्यार्थी पालक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी केली आहे.

हेही वाचा: दहावी परीक्षा रद्दचा काय होणार परिणाम? स्पर्धात्मक युगात गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर

कारोनामुळे राज्यात आत्तापर्यंत दीडशेहून अधिक शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक शिक्षक आज कोरोनाच्या संसर्गामुळे भयभीत झालेले आहेत. त्यातच काही शाळा या त्यांना शाळांमध्ये बोलावत असल्याने आणखी त्यात भर पडली आहे. अशा स्थितीत शिक्षकांनाही बारावीच्या परीक्षेची चिंता असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सरकार जो निर्णय घेईल, त्यासाठी शिक्षक आपले योगदान देण्याच्या तयारीत आहेत. मात्र राज्यातील परिस्थिती लक्षात घेऊन बारावीबाबत निर्णय होणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले.

(संपादन- विराज भागवत)

loading image