उमेदवार निवांत, आकडेमोड जोरात 

कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात शुकशुकाट.
कामोठे येथील भाजपच्या कार्यालयात शुकशुकाट.

पनवेल : विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात उमेदवारासह कार्यकर्ते प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत होते. निवडणूक झाल्‍यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मतदानानंतरचा मंगळवारचा दिवस काहीसा निवांतपणे घालवला; तर कार्यकर्त्यांची आकडेमोड सुरु असल्‍याची चर्चा रंगली होती. 

पनवेल विधानसभा मतदारसंघात एकमेकांविरोधात उभ्या असलेल्या शेकाप व भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी सकाळचा जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवण्याला पसंती दिली. गेला जवळपास महिनाभर दिवसरात्र उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनीही सुटकेचा निःश्‍वास टाकत घरीच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षीय कार्यालयात शुकशुकाट होता.  
सोमवारी सायंकाळी निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी रात्री उशिरापर्यंत कोणत्या भागात किती मतदान झाले, मतदानावेळी वातावरण कसे होते, यावर चर्चा करण्यात वेळ घालवला. 

उमेदवारांचा आत्मविश्‍वास 
निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी निवांत असलेल्या उमेदवारांनी आपण विजयी होणार असल्याचा आत्मविश्‍वास व्यक्‍त केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजयी होणार असल्याचा उत्साह आणि तितकाच दांडगा विश्वास असल्‍याचे सांगितले; तर निवडणुकीत विरोधक असलेल्या हरेश केणी यांनी नेहमीपेक्षा सकाळचा जास्त वेळ कुटुंबासोबत घालवल्यानंतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत मतदानाचा आढावा घेतला. या वेळी नागरिकांना बदल हवा आहे आणि तसा तो त्यांनी केला असल्याचे २४ तारखेला येणाऱ्या निकालातून दिसून येणार असल्याचा आत्मविश्वास केणी यांच्या बोलण्यातून दिसून येत होता.

उरणमध्ये आकडेमोड सुरू
उरणमधील उमेदवारांनी आराम करण्यापेक्षा मतदारसंघाचा आढावा घेणे पसंत केले आहे. सर्व पक्षांचे उमेदवार कार्यकर्त्यांसोबत आकडेमोड करण्यात गुंतले आहेत. 
गेले पंधरा दिवस माजी खासदार व ज्येष्ठ भाजप नेते रामशेठ ठाकूर हे कोणाच्या बाजूने, ही चर्चा सातत्याने ऐकण्यात होती; परंतु पनवेलमधील भाजप कार्यकर्त्यांनीही अपक्ष उमेदवार महेश बालदी यांचे जोरात काम केल्याचे दिसून आले. त्यामुळे २४ तारखेच्या निकालाचा अंदाज बांधायला मतदारांना अडचणीचे ठरत आहे. तसेच विरोधकांसमोरील महेश बालदींचे आव्हान शेवटपर्यंत असल्‍याची चर्चा तालुक्‍यात रंगली आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com