डहाणू तलावात कार बुडाली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

धाकटी डहाणू येथील तलावात आज (ता. 19) सकाळी साडेनऊच्या सुमारास एक भरधाव गाडी वळण घेताना अचानक तलावात गेल्याने अपघात झाला आहे.

डहाणू : धाकटी डहाणू येथील तलावात आज (ता. 19) सकाळी साडेनऊच्या सुमारास एक भरधाव गाडी वळण घेताना अचानक तलावात गेल्याने अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरीदेखील 4 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये गावातीलच एका महिलेचा समावेश असून सर्व जखमींना डहाणूतील सेवा नर्सिंग रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. 

या तलावाच्या घाटावर दररोज सकाळी धाकटी डहाणू व आसपासच्या गावातील शेकडो महिला कपडे धुण्यासाठी येतात. आज (ता.19) सकाळी साडेनऊच्या सुमारास एमएच 48 बीएच 9494 ही क्रेटा कार चिंचणीहून डहाणू शहराकडे भरधाव येत असताना तलावाजवळ वळण घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी तलावात शिरली. गाडीचा वेग जास्त असल्याने गाडी किनाऱ्यापासून बरीच आतमध्ये गेली. तसेच गाडीने तलावाच्या काठावर कपडे धुणाऱ्या कल्पना कृष्णा विंदे या महिलेला जोरदार धडक दिल्याने त्यादेखील या वेळी तलावात पडल्या. त्याच वेळी त्यांच्या कानातील सोन्याचा दागिनादेखील पाण्यात बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

महिलांनी दाखविले प्रसंगावधान 

अपघात झाल्यावर त्वरितच घाटावर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी त्या धूत असलेल्या साड्या आणि इतर कपडे एकमेकांना बांधून दोरखंड तयार केला आणि त्याच्या मदतीने गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर ग्रामस्थांनी गाडीदेखील तलावाबाहेर काढली. हा अपघात गाडी भरधाव आल्यामुळे झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

धाकटी डहाणू तलावाच्या बाजूला लागूनच डहाणू- चिंचणी- बोईसरकडे जाणारा मार्ग आहे. येथे तलावाच्या घाटालगतच रस्त्यावर वळण आहे. त्यामुळे गाड्यांचा वेग जास्त असल्यास चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवणे अवघड होते. त्यामुळे येथे ग्रामपंचायतीमार्फत संरक्षक कठडा बांधण्याची आवश्‍यकता आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या सभेत ठराव मांडण्यात येईल. जेणेकरून येथे वाहनचालकांना आणि कपडे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांना अशा दुर्घटनापासून संरक्षण मिळेल. 
- तानाजी तांडेल, उपसरपंच, धाकटी डहाणू 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The car sank in Dahanu Lake