मुंब्रा परिसराबाबत गुप्तचर यंत्रणा सावध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

उपग्रहाच्या मदतीने सोशल साईट आणि मोबाईल ऍपवर नजर

उपग्रहाच्या मदतीने सोशल साईट आणि मोबाईल ऍपवर नजर
मुंबई - मुंब्रा परिसरातील युवक दहशतवादी संघटनेत सामील होत असल्याच्या घटना काही दिवसांत उघड झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर तपास व गुप्तचर यंत्रणांनी मुंब्रा परिसरातील ऑनलाइन हालचालींवर करडी नजर ठेवली आहे. त्यासाठी उपग्रहाची मदत घेण्यात येत असून, सोशल साइटवर टाकण्यात येणाऱ्या पोस्टसह या परिसरात वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक मोबाईल ऍपवरही नजर ठेवण्यात येत आहे, अशी माहिती "एटीएस'च्या सूत्रांनी दिली. या प्रकारांमुळे मुंब्रा आणि कल्याण परिसरातील पोलिस गुप्त हालचालींवर नजर ठेवून आहेत.

मुंब्रा परिसरातून नाझिम शमशाद अहमद याच्यासह आणखी दोन युवकांना दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच्या कारणावरून अटक करण्यात आल्यानंतर मुंब्रा शहर पुन्हा चर्चेत आले आहे. अहमद हा इंटरनेटवरून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आल्याचे तपासातून उघड झाले आहे. नाझिमकडून काही मोठ्या कारवायासंदर्भात माहिती मिळाली असल्याचे सूत्रांकडून समजते.

अहमद हा कुल्फी विक्रेता मुंब्रा येथे वावरतो. त्याचे संगणक हाताळणीचे ज्ञान आणि त्याची कडव्या मुस्लिम विचारसरणीमुळे "इसिस'च्या म्होरक्‍यांनी अहमदवर भारतातील मुस्लिम युवकांशी ऑनलाइन संपर्क साधून त्यांना "इसिस'च्या जाळ्यात ओढण्याचे काम सोपवले होते.

त्यासाठी त्याने एक खास प्रोग्राम डिझाइन केला होता. नाझिम अहमद हा वेगवेगळ्या ऍपवरून चॅट करून भोळ्याभाबड्या मुस्लिम तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेत होता. दहशतवादी संघटनांचे सूत्रधार युवकांशी ऑनलाइन संपर्क साधून त्यांना चिथावणी देत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून उपग्रहाची मदत घेतली आहे.

Web Title: careful detective system in mumbra area