पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली अनेकांना कोट्यवधीचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

भांडुपमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल, एकाला अटक 

मुंबई : राज्यातील दोन हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी के.जी.एन असोसिएट या कंपनीच्या चार जणांविरोधात भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरुण शेख, मुकेश मोरे, निलोफर शेख, फलिया शेख अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी हरुण शेख याला पोलिसांनी अटक करून बुधवारी (ता. 18) मुलुंड न्यायालयात हजर केले. त्याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून इतर तीन जणांचा शोध पोलिस घेत आहेत.

 
पाच वर्षांपूर्वी के. जी. एन असोसिएशन ही कंपनी भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात सुरू करण्यात आली होती. दहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे प्रलोभन कंपनीने दाखवल्याने अनेक जणांनी आपली लाखोची गुंतवणूक कंपनीत केली. सुरुवातीच्या दोन वर्षांत अनेक गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट करूनही मिळाले; परंतु काही काळानंतर गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परतवण्यास कंपनीने टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी भांडुप पोलिस ठाण्यात याविरोधात तक्रार केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: case filed against four people in bhiwandi in money fraud