सीबीडी न्यायालयात बिल्डरवर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

नवी मुंबई : तारखेसाठी सीबीडी न्यायालयात आलेल्या नरेंद्र पटेल या बिल्डरवर न्यायालयाच्या स्वच्छतागृहात सोमवारी दुपारी दोन अनोळखी व्यक्तींनी चाकू हल्ला चढवला. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना अपोलो रुग्णालयात दाखल केले आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

बिल्डर पटेल एका खटल्याच्या कामासाठी सोमवारी न्यायालयात आले होते. पाचव्या मजल्यावरील न्यायालयात त्यांची तारीख होती. दुपारी 12 च्या सुमारास ते त्याच मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात गेले, तेव्हा त्यांच्या पाठोपाठ आत घुसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या गळ्यावर चाकूने दोन वार केले. पटेल यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत हल्लेखोरांकडील चाकू तेथेच पडला. त्यानंतर हल्लेखोरांनी पलायन केले. या घटनेनंतर पटेल यांनी आपल्या सहकाऱ्याला बोलावून घेतले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला अपोलोत दाखल केले.

त्यानंतर परिमंडळ-एकचे पोलिस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, गुन्हे शाखेचे उपायुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, न्यायालयाच्या आवारात एकही सीसी टीव्ही कॅमेरा नसल्याने पोलिसांना काहीच धागेदोरे सापडले नाहीत. प्रभाकर म्हात्रे आणि लवेश जाधव या दोघांनी हा हल्ला घडवून आणल्याचे पटेल यांनी जबानीत म्हटले आहे. ते दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 

Web Title: In the CBD court Knife attack on builder