
Mumbai News : मुंबईसह 91 ठिकाणी देशभरात सीबीआयची छापेमारी
मुंबई : सीबीआयने गुरुवारी देशभरात 91 ठिकाणी छापेमारी केली आहे . अनेक राज्यातील वैद्यकीय परिषदेद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण न करता परदेशातून पदवी घेऊन भारतात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चौकशी संदर्भात ही छापेमारी करण्यात आली.
दिल्ली, मुंबई,पुणे,नागपूर, जयपूर, पाटणा , चंदिगढ, श्रीनगर जम्मू अशा 91 ठिकाणी गुरूवारी सीबीआय अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.सीबीआयने कथित भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट, फसवणूक आणि राज्य वैद्यकीय परिषद, तत्कालीन वैद्यकीय परिषद आणि 73 परदेशी वैद्यकीय पदवीधरांच्या अज्ञात अधिकार्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने 14 राज्यतील वैद्यकीय परिषद आणि 73 परदेशी वैद्यकीय पदवीधारकांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत . या आरोपींना अनिवार्य परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) उत्तीर्ण न करता भारतात डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी देण्यात आली होती.
राष्ट्रीय परीक्षा मंडळानेही आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रशिया, युक्रेन, चीन आणि नायजेरियासह विविध देशांतील 73 एमबीबीएस वैद्यकीय पदवीधरांन एफएमजी परीक्षेत उत्तीर्ण झाले नव्हते.
यानंतर सीबीआयने छापेमारी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. नियमांनुसार, परदेशी वैद्यकीय पदवीधरांना भारतात सराव करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग किंवा राज्य वैद्यकीय परिषदेकडे तात्पुरती किंवा कायमस्वरूपी नोंदणी मिळविण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाद्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.