Mumbai : फॉरमॅट चुकल्याने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे ठरली निकामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Mumbai : फॉरमॅट चुकल्याने ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रे ठरली निकामी

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने ११ लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून जमा करत आघाडी घेतली असली तरी त्यापैकी दोन ते अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने निरुपयोगी ठरणार आहेत. तरीदेखील साडेआठ लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश मिळाले आहे. आपलीच शिवसेना खरी असा दावा सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांच्या मार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात ठाकरे गटाने आघाडी घेतली असली तरी ती निवडणूक आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने तब्बल अडीच लाख अर्ज निरुपयोगी ठरले आहेत. ठाकरे गटाने साडेआठ लाख सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. प्रत्यक्षात ठाकरे गटाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे तयार होती. मात्र आयोगाने ती बाद ठरवली असती म्हणून ही प्रतिज्ञापत्रे ठाकरे गटाने आयोगाला पाठविलीच नाहीत.

ठाकरे गटाने यापूर्वी जमा केलेल्या अडीच लाख प्रतिज्ञापत्रांत साडेचार हजार प्रतिज्ञापत्रे बोगस असल्याची तक्रार शिंदे गटाने केली आहे. त्याचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केला जात आहे. त्यामुळेच ठाकरे गट यापुढील प्रतिज्ञापत्रे काळजीपूर्वक तपासूनच आयोगाकडे पाठवत आहे. आतापर्यंत तब्बल ११ लाख शिवसैनिकांच्या प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज आणि निष्ठेची प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात आली आहेत. त्यापैकी साडेआठ लाख अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पाठवून दिली आहेत. या अर्जांचे दोन ट्रक अलीकडेच आयोगाच्या दिल्ली कार्यालयाला पाठवून देण्यात आली आहेत.