ठाण्यातील पार्किंग प्लाझामुळे मध्य रेल्वे कोट्यधीश

दीपक शेलार
Monday, 10 February 2020

ठाणे : भारतीय रेल्वे तोट्यात धावत असल्याची ओरड नेहमीच होत असते. किंबहुना वाढत्या तोट्यामुळे एकीकडे रेल्वेच्या खासगीकरणाचे वेध सरकारला लागले आहेत; मात्र ठाणे स्थानकातील वाहनांच्या पार्किंग सुविधेमुळे मध्य रेल्वे कोट्यधीश झाली आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई व इतर उपनगरी स्थानकांच्या तुलनेत ठाणे स्थानकातील वाहन पार्किंग सुविधेमुळे मागील तीन वर्षांत तब्बल 8 कोटीहून अधिक उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे.

ठाणे : भारतीय रेल्वे तोट्यात धावत असल्याची ओरड नेहमीच होत असते. किंबहुना वाढत्या तोट्यामुळे एकीकडे रेल्वेच्या खासगीकरणाचे वेध सरकारला लागले आहेत; मात्र ठाणे स्थानकातील वाहनांच्या पार्किंग सुविधेमुळे मध्य रेल्वे कोट्यधीश झाली आहे. मध्य रेल्वेवरील मुंबई व इतर उपनगरी स्थानकांच्या तुलनेत ठाणे स्थानकातील वाहन पार्किंग सुविधेमुळे मागील तीन वर्षांत तब्बल 8 कोटीहून अधिक उत्पन्न रेल्वेला प्राप्त झाले आहे.

ठाणे रेल्वेस्थानकातून सुमारे सात लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. उपनगरीय रेल्वेस्थानकांपैकी वर्दळीचे किंबहुना सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकाबाहेर पूर्व आणि पश्‍चिमेकडे वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध केली आहे.

हेही वाचा : कोरोना नव्हे, थंडीमुळे मासे महागले

फलाट क्र. 1 व 2 बाहेर असलेल्या तळ अधिक एकमजली पार्किंग प्लाझामधील 3 हजार 352 चौरस मीटर जागेत वाहन पार्किंगची सुविधा जून 2017 पासून उपलब्ध केली आहे. या ठिकाणी 2 हजार 500 हून अधिक दुचाकी वाहने पार्क केली जातात. येथील दुसऱ्या मजल्यावरील पार्किंग लॉटचे काम प्रगतिपथावर आहे; तर ठाणे स्थानकाच्या पूर्वेकडील 2 हजार 500 चौरस मीटरच्या मोकळ्या आवारात सायकल, दुचाकीसह चारचाकी अशी सुमारे 1 हजार 700 वाहने पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे. 

2016-17, 2017-18 आणि 2018-19 या तीन वर्षात पश्‍चिमेकडील पार्किंगच्या ठेक्‍यापोटी प्रतिवर्ष 1 कोटी 56 लाख असा तीन वर्षांत 4 कोटी 69 लाख आणि पूर्वेकडील पार्किंगच्या ठेक्‍यापोटी प्रतिवर्ष 1 कोटी 12 लाख याप्रमाणे 3 कोटी 36 लाखांचा महसूल असा तीन वर्षात एकूण 8 कोटी 5 लाखांचा महसूल मध्य रेल्वेला प्राप्त झाला आहे.

हेही वाचा : पाचशे रुपयांसाठी केला ब्लेडने हल्ला

अवैधरीत्या होणाऱ्या पार्किंगमुळे रेल्वेला फटका बसत असतो. तेव्हा तिकीट, जाहिरात यासह रेल्वेच्या महसुलात आता वाहनांच्या पार्किंगमुळेही घसघशीत आमदनी झाल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज स्थानक) आणि इतर उपनगरांच्या तुलनेत ठाणे स्थानकाच्या पार्किंगमधून सर्वाधिक महसूल मिळाल्याने मध्य रेल्वेला "अच्छे दिन' आल्याचे बोलले जात आहे. 

दुसऱ्या मजल्याचे काम प्रगतिपथावर 
ठाणे पश्‍चिमेकडील तळ अधिक दुमजली पार्किंग प्लाझाचे भूमिपूजन जून 2015 मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले होते. पुरेसा निधी उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्याने अर्धवट बांधलेल्या पार्किंग प्लाझाचे उद्‌घाटन 15 जून 2017 ला पार पडले. खासगी ठेकेदारामार्फत चालवल्या जाणाऱ्या या पार्किंग प्लाझामध्ये सध्या तळमजल्यासह पहिल्या मजल्यावर दुचाकी वाहने पार्क केली जातात. दुसऱ्या मजल्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

असे आहेत पार्किंगचे दर 

  • ठाणे पूर्व आणि पश्‍चिमेकडील पार्किंगमध्ये पहिल्या दोन तासांसाठी प्रतिसायकल 5 रुपये, दुचाकीसाठी 10 रुपये आणि चारचाकीसाठी 20 रुपये, दोन ते सहा तासांसाठी दुप्पट आकार, 6 ते 12 तासांसाठी अनुक्रमे 15, 30 आणि चारचाकीसाठी 80 रुपये
  • 12 तासाहून अधिक काळ पार्किंगसाठी सायकलला 20 रुपये, दुचाकीला 40 आणि चारचाकीसाठी 100 रुपये आकारले जातात. दरम्यान, मासिक पास काढणाऱ्या सायकलस्वारांना 200 रुपये, दुचाकीस्वारांना 400 रुपये आणि चारचाकीधारकांसाठी प्रतिमाह 900 रुपये आकारण्यात येतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Railway billions due to parking plaza in Thane