लॉकडाऊनदरम्यान मध्य रेल्वेची दमदार कामगिरी; मुंबई विभागाने केली 'इतक्या' लाख वॅगन्सची मालवाहतूक...

प्रशांत कांबळे
Sunday, 12 July 2020

मध्य रेल्वेने क्षेत्रिय (झोनल) आणि विभागीय (डिव्हीजन) स्तरावर 'मल्टीडिसिप्लीनरी बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट' (बीडीयू) ची स्थापना केली आहे. यामध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे

मुंबई : कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशभरातील प्रवासी रेल्वेसेवा बंद होती. मात्र, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हातभार म्हणून मध्य रेल्वेने देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात मालगाड्या व पार्सल गाड्या चालवून अत्यावश्यत वस्तूंची पुरवठा केला आहे. मजुरांची आणि वाहतुकीच्या सुविधांची मर्यादित उपलब्धता असताना मालवाहतूक करण्यासाठी मध्य रेल्वेने प्राधान्य दिले. 23 मार्चपासून आतापर्यंत मध्य रेल्वेने 2.74 लाख वॅगन्समधून तब्बल 14.42 दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे.

...तर वीजग्राहकांना होऊ शकतो 750 रुपयांचा दंड; वाचा सविस्तर...

मध्य रेल्वेच्या एकट्या मुंबई विभागात 1,07,993 वॅगन्सची मालवाहतूक करण्यात आली. ज्यामध्ये कंटेनर वाहतुकीचे 74,585 वॅगन्स, खतांचे 11,066  वॅगन्स, पेट्रोलियम आणि तेल उत्पादनांचे 8,463 वॅगन्स, लोह व स्टीलचे 5,969 वॅगन्स, कोळशाचे 4,485 वॅगन्स आणि इतर वस्तूंच्या 3,425 वॅगन्सचा समावेश आहे.

इच्छाशक्तीचा विजय; अवघ्या दहा दिवसांत डोंबिवलीतील 91 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात...

मध्य रेल्वेने क्षेत्रिय (झोनल) आणि विभागीय (डिव्हीजन) स्तरावर 'मल्टीडिसिप्लीनरी बिझिनेस डेव्हलपमेंट युनिट' (बीडीयू) ची स्थापना केली आहे. यामध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या युनिटच्या माध्यमातून जास्तीत जास्त माल वाहतूक प्रभावीपणे राबवण्यासाठी व्यापार आणि उद्योगाशी वारंवार संवाद साधला जात आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central railway make transportation of 2.74 lakhs vagon of goods