
Vande Bharat Express : वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी सुरु
मुंबई :मध्य रेल्वेची पहिली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर आता शनिवारपासून घाट विभागात चाचणी सुरु करण्यात आली आहेत. तर, दुसरी वंदे भारत ७ ते ८ फेब्रुवारी पर्यंत मध्य रेल्वेचा ताफ्यात दाखल होणार आहे.
सीएसएमटी- साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी - सोलापूर या दोन वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला १० फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहे. बहुप्रतीक्षित असलेली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गुरुवारी रात्री दाखल झाली आहे.
आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत वंदे भारत एक्स्प्रेसची बांधणी करण्यात येत आहे. वंदे भारत २.० प्रकारातील ही सातवी रेल्वेगाडी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत या मार्गावर १०५ किमी प्रतितास, कर्जत-लोणावळा दरम्यान ५५ किमीप्रतितास आणि लोणावळा-सोलापूर दरम्यान ११० किमीप्रतितास या वेगाने धावण्यासाठी या गाडीला मंजूरी देण्यात आलेली आहे.
वंदे भारत २.० या एक्स्प्रेसला ० ते १६० किमीप्रतितास हा वेग गाठण्यासाठी १२९ सेकंद लागतात. यापूर्वी धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला या वेगासाठी १४६ सेकंद लागत होते. नव्या धाटणीतील वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांचा आहे.