लोकल सुरु होणार का? मध्य रेल्वेने दिली महत्वाची माहिती...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

मुंबईत पुढच्या आठवड्यापासून लोकल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसनं मुंबईत थैमान घातलं आहे. या व्हायरसचा सर्वात जास्त प्रार्दुभाव हा मुंबईत पाहायला मिळतोय. लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक सेवा ठप्प आहे. त्यातच लोकल सेवाही बंद आहे. मुंबईतल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना आपल्या कामावर जाण्यासाठी लोकल सेवा हा एकच पर्याय आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा बंद करण्यात आली. मात्र गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली लोकल सेवा आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू करणार येणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही सूचना मिळाली नसल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

वाचा ः ब्रेकिंग: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गळफास घेऊन आत्महत्या

उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक अफवा पसरत आहेत. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळालेले नाहीत. त्याबाबतच्या सूचना मिळताच माहिती देण्यात येईल, असं ट्विट शिवाजी सुतार यांनी केलं आहे.

लाईफलाईन पुढच्या आठवड्यात धावणार?
मुंबईत पुढच्या आठवड्यापासून लोकल सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात अत्यावश्यक सेवेतील कामगारांची ने-आण करण्यासाठी लोकल सुरू करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडं केली होती. हा लोकल प्रवास सर्वांसाठी राहणार नसून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच रेल्वे प्रवासास मुभा राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 

वाचा ः सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर 'या' आहेत सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया..

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सेवा कशी उपयुक्त आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: central railways gives clarification over the resumption of local service in mumbai