राहुल गांधी यांच्याविरोधात आरोप निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याचे आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात फेटाळले. त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणी आरोप निश्‍चित करण्यात आले.

मुंबई - महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात मानहानीकारक वक्तव्य केल्याचे आरोप कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी भिवंडी दंडाधिकारी न्यायालयात फेटाळले. त्यामुळे त्यांच्यावर या प्रकरणी आरोप निश्‍चित करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. सहा मार्च 2014 रोजी भिवंडीत झालेल्या जाहीर सभेत महात्मा गांधींच्या हत्येबाबत संघाविरोधात अपमानास्पद विधाने केल्याप्रकरणी तुमच्याविरोधात आरोप निश्‍चित करायचे असल्याने, याबाबत काही सांगावयाचे आहे का, अशी विचारणा दंडाधिकारी ए. आय. शेख यांनी केली. त्या वेळी राहुल यांनी जबाब नोंदवत आपल्यावरील आरोप फेटाळले. त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम 499 आणि कलम 500 अन्वये त्यांच्याविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी दहा ऑगस्टपर्यंत तहकूब केली.

यापूर्वी दोन मे रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान दंडाधिकारी शेख यांनी आरोप निश्‍चित करण्यासाठी राहुल यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत आणि अशोक चव्हाण, संजय निरुपम यांच्यासह ते न्यायालयात हजर झाले होते. पुढील सुनावणीदरम्यान राहुल यांच्या भाषणाच्या प्रतीसह (ट्रान्सक्रिप्ट) काही कागदपत्रे पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती राहुल यांचे वकील नारायण नायर आणि कुशल मोर यांनी दिली. ही कागदपत्रे पुरावा म्हणून स्वीकारायची की नाही, याबाबत न्यायालय निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

...तर दोन वर्षांची शिक्षा
भादंवि कलम 499 मानहानी आणि कलम 500 अंतर्गत आरोप सिद्ध झाले, तर संबंधित व्यक्तीला किमान दोन वर्षांपर्यंत साधी कैद आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.

Web Title: The charges against Rahul Gandhi are definite