'सेबी'च्या बॉसगिरीला सनदी लेखापालांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

सेबीच्या नियंत्रणाखाली जाण्यास सनदी लेखापालांची शिखर संस्था दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) विरोध केला आहे.

मुंबई - कॉर्पोरेट आणि बँकिंग क्षेत्रातील आर्थिक घोटाळ्यामुळे भांडवली बाजार नियंत्रक सेबीने सनदी लेखापाल (सीए) आणि कंपनी सचिव (सीएस) यांना कार्यकक्षेत आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र सेबीच्या नियंत्रणाखाली जाण्यास सनदी लेखापालांची शिखर संस्था दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने (आयसीएआय) विरोध केला आहे. 'आयसीएआय' स्वतः नियंत्रक असून त्यावर सुपर कंट्रोलरची गरज नाही, असे आयसीएआय बोर्डाचे सदस्य आणि अकौंटिंग बोर्ड स्टॅण्डर्डचे अध्यक्ष सीए. शिवाजी. बी. झावरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. 

सीए झावरे म्हणाले की, आयसीएआय ही स्वतंत्र आणि सक्षम संस्था आहे. त्यामुळे त्यावर नवा नियंत्रक आणण्याची गरज नाही. सेबीच्या प्रस्तवाला आयसीएआय कडाडून विरोध करत असून याबाबत अर्थ खात्यासमोर म्हणणे मांडले जाईल, असे त्यांनी सांगितले. आयसीएआय बोर्डावर 40 टक्के प्रतिनिधी सरकारचे आणि इतर नियंत्रकांचे आहेत त्यामुळे बोर्डातील निर्णय सर्वानुमते होतात. प्रत्येक आर्थिक घोटाळ्यात सीए जबाबदार असतात असे चुकीचे चित्र सध्या माध्यमांमध्ये आहे. मात्र दोषी सीएवर कारवाईसाठी 'आयसीएआय' कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. देशात येऊ घातलेल्या नव्या अकौंटिंग्ज स्टॅण्डर्डबाबत मुंबईत सनदी लेखापालांची तीन दिवसीय परिषद भरली आहे. या परिषदेची माहिती झावरे यांनी दिली.

कंपनी ऑडीट (लेखा परिक्षण) फेरफार केल्यास सनदी लेखापाल (सीए) आणि कंपनी सचिवांवर (सीएस) कठोर कारवाईसाठी सेबीच्या कार्यकक्षा वाढवण्याबाबत कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. 

पंजाब नॅशनल बॅंकेचा तपासात खोडा -
नीरव मोदी प्रकरणात बँकेच्या अंतर्गत हिशेब तपासणी आणि इतर ऑडीटची चौकशी करण्यासाठी 'आयसीएआय'ने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र पंजाब नॅशनल बँकेकडून चौकशीत सहकार्य मिळत नसल्याचा आरोप 'आयसीएआय'ने केला आहे. यामुळे तपास अहवाल रखडला आहे. अखेर फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात अर्थ खात्याने रिजर्व्ह बँकेला पीएनबी मधील माहिती आयसीएआय ला देण्याचे आदेश दिले आहेत, असे झावरे यांनी सांगितले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Charted Accountants Opposes SEBIs Domination