ठाण्यातील विकास पाहा! मुख्यमंत्र्यांचा मुंबईच्या आयुक्तांना सल्ला 

ठाण्यातील विकास पाहा! मुख्यमंत्र्यांचा मुंबईच्या आयुक्तांना सल्ला 

ठाणे : शिवसेनेच्या स्थापनेनंतर ठाणे शहराने शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता दिल्याने ठाणे शहराबद्दल एक वेगळा अभिमान आहे. या शहरात आज अनेक विकासकामांच्या उद्‌घाटनासाठी एक मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित राहण्याचा एक वेगळा आनंद आहे. ठाण्यातील अनेक विकासकामे पाहिल्यानंतर मुंबईच्या आयुक्तांनाही आम्ही ठाण्यातील विकासकामे पाहण्याचा सल्ला देत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

आज किसननगर येथील क्‍लस्टरसह ठाण्यातील विविध विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात आले होते. मुख्यमंत्री म्हणून ठाण्यात पहिल्यांदाच ते येत असल्याने शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या क्‍लस्टरचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी शिवसेनेचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे कौतुक केले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या विकासासाठी ज्या गोष्टी राज्य सरकारकडून लागतील त्या देण्यास आपण कधीही मागेपुढे पाहणार नसल्याचा शब्द दिला. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते. 

आताचे ठाणे पूर्वीचे ठाणे याच्यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. ठाण्याचं रूप बदललं तरी ठाणेकर साधे आहेत. ठाणेकरांनी एकदा आशीर्वाद दिले की ते कायम राहतात. अशा वेळी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना आनंदाच्या क्षणी मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची आठवण येते. माझं कर्तृत्व शून्य असून हे सर्व शिवसैनिकांचं देणं असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सागितले. आज ठाण्यात चिकटून इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी क्‍लस्टर विषयावर आंदोलन झाले. क्‍लस्टर विषयावर शहर बंद केल्यानंतर आता मात्र सत्ता मिळाल्यावर बोलती बंद होता कामा नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच क्‍लस्टर योजना यशस्वी होणारच, असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच पोलिस आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना प्रत्येक योजनेत 10 टक्के घर द्या, असे आदेश त्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिले. 

ही बातमी वाचा ः भिवंडीत कापड डाईंग कंपनीला आग
तीन विचारांच्या सरकारकडून देशाला दिशा 
त्याचबरोबर अनधिकृत इमारतीतील लोकांना त्यांचे पुनर्वसन करताना सहकार्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. मुळात या नागरिकांची मते जर अधिकृत असतील तर त्यांच्या इमारती अनधिकृत कशा काय, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. तीन विचारांचे सरकार आजच्या घडीला देशाला एक दिशा दाखवत असल्याचा विश्‍वास या वेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे प्रत्येक क्षेत्रात दिशा दाखवत आहे. तसेच हे सरकार राजकारणाला दिशा दाखवत आहे. तसेच ठाण्यातील हा क्‍लस्टर प्रकल्प देशातील सर्वांत मोठा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाकडे मुंबई, ठाणे नव्हे तर देशाचे लक्ष लागल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मातोश्रीवर मायेचा ओलावा ः जितेंद्र आव्हाड 
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करताना राजकीय कंफर्ट वाटलं. मातेची ममता काय असते ते मातोश्रीवर गेल्यावर कळाल्याची भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे आणि आम्ही कधीच कमरेखाली वार केले नाहीत. गुप्त मैत्री टिकवून ठेवली. आज लोक तोंडावर गोड बोलतात आणि मागून पाठीवर वार करतात. त्याचा प्रत्यय आल्यानंतरच हे सरकार आले असल्याचे त्यांनी सांगितले. 

विकास कामांचा धडाका 
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तीनहात नाका येथील स्मारक, "ग्लोबल इम्पॅक्‍ट हबचे ई-उद्‌घाटन व संकेतस्थळाचे अनावरण', "कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर', "खाडी किनारा विकास प्रकल्प', "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना', "घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प, "शहरी वनीकरण प्रकल्प' तसेच "विज्ञान केंद्र प्रकल्प आदी प्रकल्पांचा ई-भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना बीएसयूपी योजनेंतर्गत सदनिका व रोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले. अनाथ, निराधार, निराश्रीत बालके तसेच एचआयव्हीबाधित पालकांची मुले यांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतीची तरतूद असलेल्या योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात "अनुदान वाटप' करण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com