तारापूरात कारखान्यातून रसायनाची गळती, विषारी वायूमुळे महिलेसह 6 कामगारांना बाधा

संदीप पंडीत
Monday, 7 September 2020

केमिकोन कारखान्यात 10 ते 12 कामगार काम करीत असून दिवस पाळीत कारखान्यात उत्पादन सुरू असते. सकाळी सात वाजता टाकी फुटल्याचे कारण समजू शकले नाही.

विरार : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील केमिकोन केमिकल्स या कारखान्यात "फॉर्मलडिहाइड' या रसायनाचा साठा असलेली वीस टन क्षमतेची टाकी सकाळी सातच्या सुमारास अचानक फुटली होती. त्यामुळे टाकीतील रसायन वातावरणाच्या संपर्कात आल्याने विषारी वायूची निर्मिती झाली होती. विषारी वायूची बाधा झाल्याने एक कामगार महिला गंभीर परिणाम झाली, तर सहा कामगारांना किरकोळ बाधा झाली होती. कारखान्यालगतच्या 50 हून अधिक कारखान्यांमधील कामगार आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना विषारी वायूची बाधा होऊन डोळे जळजळणे, डोके दुखी आणि घशात खवखवण्यासारखी लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. 

हे ही वाचा : वरळी येथील इमारतीच्या लिफ्टमध्ये गुदमरून एकाचा मृत्यू; पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू

विषारी वायूमुळे कारखान्यालगतच्या प्लॉट क्र. डब्ल्यू 24 या कारखान्यातील दामिनी भगवान सिंग (वय 21) नामक कामगार महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तिला उपचारासाठी तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाधा झालेल्या इतर सहा कामगारांना प्रथमोपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. केमिकोन कारखान्यात टेक्‍सटाईल एझल्रिजचे उत्पादन घेतले जाते. कारखाना प्रमोद मेहता यांच्या मालकीचा असून, गेल्या वर्षी याच मालकाच्या हिमसन केमिकल प्लाट नंबर एन 75 या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाला होता. केमिकोन कारखान्यात 10 ते 12 कामगार काम करीत असून दिवस पाळीत कारखान्यात उत्पादन सुरू असते. सकाळी सात वाजता टाकी फुटल्याचे कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या चार बंबावरील जवानांच्या सहा तासांच्या अथक प्रयत्नांनी रसायनाचा प्रादुर्भाव कमी केला. दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लगतचे सुमारे 50 कारखाने बंद ठेवण्यात आले होते.

मोठी बातमी : मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णवाढीचा भडका; BMC ने दिले 'हे' कारण

याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप कसबे तपास करत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग ही याप्रकरणी चौकशी करत आहेत. 

(संपादन : वैभव गाटे)

Chemical leak from factory in Tarapur 6 workers including woman affected


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chemical leak from factory in Tarapur 6 workers including woman affected