ड्रग्ज तस्करांचा साठेबाजीवर भर! लॉकडाऊनमुळे तोटा भरून काढण्यासाठी उपाय

अनिश पाटील
Monday, 30 November 2020

तस्करांनी आता तस्करीतील ड्रग्जचा साठा वाढवला असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयातील (डीआरआय) सूत्रांनी दिली. 

मुंबई ः कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने ड्रग्ज तस्करांना मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी तस्करांनी आता तस्करीतील ड्रग्जचा साठा वाढवला असल्याची माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयातील (डीआरआय) सूत्रांनी दिली. 

हेही वाचा - महाराष्ट्रातील गुंतवणूक उत्तर प्रदेशात नेण्याचा डाव; कॉंग्रेसचे सचिन सावंत यांचा आरोप

लॉकडाऊनमुळे अनेक देशांनी विमान प्रवासावर बंदी घातली आहे. अनेक देशांमध्ये तुरळक प्रमाणात विमान वाहतूक सुरू आहे, तर काही देशांमध्ये अद्याप विमान वाहतूक पूर्वपदावर आली नाही. त्याचा फटका ड्रग्ज तस्करांना बसला असून, त्यामुळे हा तोटा भरून काढण्यासाठी तस्करीतील ड्रग्जचा साठा वाढवला आहे. त्याशिवाय त्यांच्या मोड्‌स ऑपरेंडीमध्येही बदल झाला आहे. यापूर्वी आफ्रिकी व दक्षिण अमेरिकन देशातील नागरिकांचा तस्करीसाठी वापर केला जायचा. आता मालावियन, गिनी प्रजासत्ताक यांसारख्या देशांतील नागरिकांचा वापर केला जात आहे. तसेच कार्गोचाही मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. 
तोटा भरून काढण्यासाठी एकावेळी पाठवण्यात येणाऱ्या ड्रग्जच्या साठ्यातही वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरात चार कारवायांमध्येच डीआरआयने 24 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले. तसेच अनेक देशांमध्ये प्रवासी विमान वाहतुकीवर कडक निर्बंध असल्यामुळे छोट्या प्रमाणातील ड्रग्जसाठी कुरिअर व मोठ्या साठ्यासाठी सागरी मार्गाचा वापर होत असल्याचे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

हेही वाचा कलेला धर्माचा चष्मा लावणे योग्य नाही; नवाब मलिकांची टीका

गरीब, गरजू जाळ्यात 
वैद्यकीय सेवेसाठी परदेशी जाण्याच्या नावाखालीही तस्करी करण्यात येत आहे. त्यासाठी गरीब व गरजू व्यक्तींचा शोध करून कमी पैशांमध्ये त्यांच्याकडून हे काम केले जाते. त्याला अनेक जण बळीही पडतात. कधी-कधी खरेच आजारी व्यक्तीचाही त्याच्या उपचाराच्या खर्चाच्या नावाखाली तस्करीत वापर केला जात असल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

chemical product focus on hoarding Measures to offset losses due to lockdown

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chemical product focus on hoarding Measures to offset losses due to lockdown