छगन भुजबळांना तुरुंगात मोठ्ठा टीव्ही, चिकन मसाला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

मुंबई - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ऑर्थर रोड तुरुंगात विशेष सुविधा दिल्या जात आहेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांनी अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) भूषणकुमार उपाध्याय यांना ई-मेल पाठवून याबाबत तक्रार केली. अतिरिक्त महासंचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. 

बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ एक वर्षाहून अधिक काळ तुरुंगात आहेत. त्यांच्यासाठी पाच फुटांचा टीव्ही देण्यात आला आहे. त्यावर ते हिंदी चित्रपट पाहत बसतात. जेवणात चिकन मसाल्यासारखे आवडते पदार्थ त्यांना दिले जातात. दर दोन तासांनी फळे दिली जातात, असा आरोप दमानिया यांनी तक्रारीत केला आहे. समीर भुजबळ यांनाही तुरुंगात नारळपाण्यातून व्होडका दारू पुरवली जाते. त्यांना सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास मोबाईलवर बोलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी खास जागा ठेवण्यात आली असून, तिथे मोबाईल जॅमर नाही, असेही तक्रारीत म्हटले आहे. तेथील विशेष अधिकारीही भुजबळांना मदत करत आहेत. न्यायालयात नेतानाही भुजबळ यांना अनेक लोकांना भेटू दिले जाते, असेही दमानिया यांचे म्हणणे आहे. 

याप्रकरणी अतिरिक्त महासंचालकांनी तुरुंग अधिकारी स्वाती साठे यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांना 30 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. 

Web Title: Chhagan Bhujbal's TV in prison