Eknath Shinde : रविवारी मुख्यमंत्री डोंबिवलीत डोंबिवली शिवसेना शाखेच्या उद्घाटनाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

Eknath Shinde : रविवारी मुख्यमंत्री डोंबिवलीत डोंबिवली शिवसेना शाखेच्या उद्घाटनाची शक्यता

डोंबिवली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने डोंबिवली व कल्याण ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या पदाधिकाऱ्यांची पदे तशीच ठेवत गटात नव्याने आलेल्यांना पदे देऊन खुष करण्यात आले आहे. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत बुधवारी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या शिवसेनेची डोंबिवली मध्यवर्ती शाखा आता शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. येत्या रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण डोंबिवलीत विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने येणार असून याच दिवशी या शाखेचे नव्याने उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. याविषयी सध्या तरी शिंदे गटाने चुप्पी साधली असली तरी याचीच चर्चा शहरात रंगली आहे.

बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर शिवसेना पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठींबा दिला होता त्या पदाधिकाऱ्यांचे पदे कायम ठेवण्यात आली आहेत. तर भाजपा, मनसे पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेले व नंतर शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्यांना तालुका प्रमुख, जिल्हा समन्वयक, उपशहर प्रमुख, विधानसभा संघटक अशी पदे देत खुश करण्यात आले आहे. या पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका बुधवारी डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयात जाहीर करण्यात आल्या. कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी या नियुक्त्या प्रसिद्धीमाध्यमांना वाचून दाखवल्या. यावेळी राजेश कदम, बंडू पाटील, संतोष चव्हाण उपस्थित होते. रिक्त असलेल्या पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका झाल्याने संघटनात्मक काम आता अधिक वेगाने होईल असा विश्वास यावेळी लांडगे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेची डोंबिवली मध्यवर्ती शाखा सध्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे. या शाखेचे नुतनीकरण करण्यात आले आहे. येत्या रविवारी 13 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण डोंबिवलीत येणार असून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याविषयी पदाधिकाऱ्यांना विचारले असता सुनिश्चित कार्यक्रम लवकरच तुम्हाला कळविला जाईल असे सांगत यावर अधिक बोलणे टाळले. गेल्या महिन्याभरापासून डोंबिवली मध्यवर्ती शाखा कोणाची यावरुन वाद सुरू असल्याने तो विषय गाजत होता. शिंदे गटाला ठाकरे गटाकडून शाखेत येण्यास अटकाव झाल्याने शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न जणू निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर कायदेशीर रित्या शिंदे गटाने या शाखेवर ताबा मिळविला. यामुळे या शाखेचे उद्घाटन देखील त्याच थाटामाटात करत ठाकरे गटाला आपली ताकद दाखविणार अशी चर्चा शहरात सुरु आहे.

डोंबिवली व कल्याण ग्रामीणचे कामकाज या शाखेतून

शिवसेनेच्या काळात डोंबिवली शहर शाखेतून कल्याण ग्रामीणचे प्रशासकीय कामकाज चालणार असल्याचे जाहीर होताच ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांचे मन शहर शाखेतून वळविण्यात आले होते. आता शिंदे गटाने या शाखेतून डोंबिवली व ग्रामीणचे प्रशासकीय कामकाज चालणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. याविषयी लांडगे म्हणाले, शिवसेना मध्यवर्ती कार्यालय डोंबिवली या शहर शाखेतून लोकसभा - विधानसभा महानगरपालिका यांचे कामकाज पूर्वीपासून सुरु होते. ग्रामीण विधानसभा व डोंबिवली शहर हे काम याच शाखेतून केले जाते. यापुढेही प्रशासकीय कामकाज याच शाखेतून होईल. लोकांच्या संपर्कासाठी शाखा आणि संपर्क कार्यालय ही वेगवेगळी आहेत.