चारा छावण्या सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ऑडिओ ब्रिजद्वारे सांगलीशी संवाद

Chief Ministers Devendra Fadnavis instructions to start fodder camps dialogue with Sangli by audio bridge
Chief Ministers Devendra Fadnavis instructions to start fodder camps dialogue with Sangli by audio bridge

मुंबई : सांगली जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी तात्पुरत्या व तातडीच्या उपाय योजना राबविण्यावर प्रशासनाने भर द्यावा. सध्या सांगलीत एकूण 4 चारा छावण्या सुरु असल्या तरी जनावरांची संख्या लक्षात घेऊन वाढीव चारा छावण्या सुरु कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज ऑडिओ ब्रिजच्या प्रणालीद्वारे सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने जत, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर -विटा या दुष्काळी तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि जिल्हाधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याशी संवाद साधला. सरपंचांनी केलेल्या चारा छावण्या, टँकर, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी बाबींच्या तक्रारींची तसेच जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉटसअॅपवर येणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला यावेळी दिले. सांगली जिल्ह्यातील जनावरांची संख्या लक्षात घेता चारा छावण्या सुरु कराव्यात तसेच ज्या तालुक्यांमध्ये पाण्याच्या गरजेनुसार तेथे टँकर सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनास दिले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सध्याची स्थिती पाहून चारा छावणी, टँकर पुरवठा, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती आदी तातडीच्या उपायांवर भर द्यावा. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना नाहीत, अशा ठिकाणी या योजना सुरू करण्यासंदर्भातील अहवाल तयार करावे. टँकरची मागणी असल्यास पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ प्रस्ताव मंजूर करावेत. जनावरांसाठीही टँकरद्वारे पाणी पुरविण्यात यावे. सिंचन विहिरी अथवा तलावामधील पाण्याच्या स्त्रोताचा वापर करण्यासंदर्भात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागाचे अहवाल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कार्यवाही करावी.

  • पिण्याच्या पाण्यास प्राधान्य द्यावे -
    पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ सांगली जिल्ह्यात आजअखेर 16 विंधण विहिरीद्वारे आणि 96 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळ पाणी पुरवठा योजनांची विद्युत देयकाची रक्कम महावितरण कंपनीस देण्यात आली असून, सर्व नळ पाणी पुरवठांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. याशिवाय पाणी पुरवठा योजनांना नियमित विद्युत पुरवठा होईल याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. तसेच पिण्याच्या पाणी पुरवठ्यास प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

     
  • चारा छावण्या सुरु करण्यास प्राधान्य द्यावे -
    सध्या सांगली जिल्ह्यात एकूण शासकीय 3 आणि सेवाभावी संस्थेमार्फत 1 अशा 4 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये मोठी जनावरे 1 हजार 418 तर लहान 322 अशी 1 हजार 740 जनावरे आहेत. आणखी चारा छावण्यांची गरज असल्यास चारा छावण्या सुरु करण्यास प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

     
  • रोहयोअंतर्गत जिल्ह्यात कामे सुरू -
    सांगली जिल्ह्यातील 10 पैकी 5 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तर जिल्ह्यातील 10 तालुक्यांपैकी 6 तालुक्यांमधील 176  गावे व 1 हजार 83 वाड्या-वस्त्यांमध्ये एकूण 183  टँकर सुरु आहेत. सर्वाधिक जत तालुक्यात 107 तर सर्वात कमी मिरज तालुक्यात 6 टँकर सुरू आहेत.  


 

तालुका टँकर्सची संख्या
जत 107
आटपाडी 34
कवठेमहांकाळ  13
तासगाव 12
खानापूर -विटा 12
मिरज 6
सांगली एकूण टँकर्स 183





महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात 357 कामे सुरु असून त्यावर 2 हजार 666 मजूर उपस्थित आहेत. जिल्ह्यामध्ये 10 हजार 150 कामे शेल्फवर आहेत.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी जिल्ह्यात आजअखेर 16 विंधन विहिरी, 96 विहिरींचे अधिग्रहण करुन पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. थकित विद्युत देयकामुळे बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी 3.88 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या योजनांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

  • सांगली जिल्ह्यातील 277 गावातील शेतकऱ्यांना मदत -
    सांगली जिल्ह्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 5 तालुक्यातील 277 गावातील 2 लाख 18 हजार 868 शेतकऱ्यांना 116.11 कोटी रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील एकूण 81 हजार 846 शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केली होती. या हंगामात नुकसान भरपाईपोटी 26.83 कोटी इतकी रक्कम 41 हजार 100 पात्र शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 1.99 लक्ष शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी 59 हजार 371 शेतकऱ्यांना 2000 रुपये प्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण 11.88 कोटी रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सुरु आहे.

दुष्काळ आढावा बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव अनुपकुमार, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, मदत व  पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com