पालकांना दिलासा! अंगणवाडीत बालकांवर आता प्रथमोपचार

संग्रहित
संग्रहित

महाड : रायगड जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या बालकांची आरोग्याची काळजी आता प्रशासन घेणार आहे. रायगड जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार अंगणवाड्यांमध्ये प्रथमोपचार पेट्या पुरवल्या आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांमध्ये आवश्‍यकता वाटल्यास बालकांवर तातडीने प्रथमोपचार करणे शक्‍य होणार आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. 

सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत रायगड जिल्ह्यामध्ये अंगणवाड्या चालवल्या जात आहेत. या अंगणवाड्या प्रामुख्याने ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर वसलेल्या आहेत. यामध्ये मिनी अंगणवाडींचा समावेश आहे.

या अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस मुलांच्या शिक्षणासाठी; तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत असतात. मुलांना खेळण्यासाठी खेळणी व त्यातून अभ्यासही घेतला जात असतो. ग्रामीण भागातील अंगणवाडीमधील बालकांचे आरोग्य, पोषण आणि शिक्षणाचे मध्यवर्ती केंद्र अंगणवाडी मानले जाते. 

अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणीबरोबर मुलांना पोषण व पूरक आहार दिला जातो. आजार होऊ नये, यासाठी त्यांचे लसीकरण केले जात असते. कुपोषण निर्मूलनासाठी विशेष प्रयत्नही केले जातात. गर्भवतींच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.

ग्रामीण भागातील अनेक पालक तीन ते सहा वयोगटातील मुलांना गावातील अंगणवाडीमध्ये शिक्षणासाठी पाठवतात. या मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

रायगड जिल्हा परिषदेने सेस फंडातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना प्रथमोपचार पेटी पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वी 2 हजार 180 अंगणवाड्यांना प्रथमोपचार पेट्या रवाना झाल्या आहेत. जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाचे 17 प्रकल्प असून त्यांना या पेट्या पाठवल्या आहेत.

महाड तालुक्‍यात 234 पेट्या दोन टप्प्यात मिळाल्या आहेत. प्रथमोपचार पेटीत कापूस, बॅंडेज, बॅंडेड पट्टी, मलम, कात्री; तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम, अँटिसेप्टिक लोशन, गोळ्या अशी सुमारे 16 प्रकारची प्रथम उपचार करणारी औषधे या किटमध्ये देण्यात आली आहेत. मिनी अंगणवाडीमध्येही प्रथम उपचार-पेटी दिली जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांना प्रथमोपचार करण्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. 

दृष्टिपेक्षात 
बालकांची संख्या : 1 लाख 67 हजार 552 
एकूण अंगणवाड्या : 3 हजार 287 
प्रथमोपचार पेट्या उपलब्ध : 2 हजार 180 

महाड तालुक्‍यातील अंगणवाड्यांना दोन टप्प्यात प्रथमोपचार पेट्या मिळाल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने याचा फायदा बालकांना होईल. 
- राजश्री बने, प्रकल्प अधिकारी, महाड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com