esakal | मुंबईत नायर रुग्णालयात बालकांवर क्लिनिकल चाचणी, एथिक कमिटीची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

 Children test

मुंबईत नायर रुग्णालयात बालकांवर क्लिनिकल चाचणी, एथिक कमिटीची परवानगी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड संसर्गापासून (Corona Infection) बचावासाठी मुंबईत प्रथमच लहान मुलांवर क्लिनिकल चाचणी (Children Tests) सुरू झाली आहे. ही चाचणी महापालिकेच्या (BMC) नायर रुग्णालयात (Nair Hospital) केली जात आहे. झायडोस कॅडिला हेल्थकेअर कंपनीतर्फे मुलांसाठी बनवलेली झायकोव्ह-डी लसीची (Corona Vaccine) चाचणी मुलांवर केली जाणार आहे. या क्लिनिकल ट्रायलला एथिक कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर याबाबतची सर्व प्रक्रिया सुरू झाली असून चाचणीही सुरू झाली आहे. दरम्यान, फक्त सुदृढ बालकांनाच ही लस दिली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून (BMC Authorities) स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान,  दोन मुलांची या क्लिनिकल ट्रायलसाठी (Clinical trail) निवड करण्यात आली आहे. ( Children clinical trail permitted by Ethic Committee two child selected)

प्रौढांसाठी कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक अशा एकूण 3 लसी उपलब्ध आहेत, ज्या कोरोनापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण देतात, परंतु अद्याप मुलांसाठी कोणताही लस उपलब्ध नाही. त्याचवेळी, तज्ञांनी सांगितले की भविष्यात मुलांवर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. अशा परिस्थितीत मुलांमध्ये कोरोनाला प्रतिबंध, संरक्षण आणि उपचार यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. दरम्यान, नायर रुग्णालयातून पालकांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे की मुलांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेल्या लसीची चाचणी सुरू झाली आहे.

हेही वाचा: मुंबईत कोरोना चाचण्यांचा वेग मंदावला! सोमवारी 27,827 चाचण्या

महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयाचे संचालक आणि नायर रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, या ट्रायलची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एथिक कमिटीची परवानगीही मिळाली आहे. झायडोस कॅडिलानेही ट्रायलसाठी हिरवा कंदील दिला आहे. 12 ते 17 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नावनोंदणीचे काम सुरू आहे. मुंबईतील मुलांवर घेण्यात येणारी ही पहिली चाचणी आहे. या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा कालावधी एक वर्ष आहे.

नागरिकांना आवाहन

या वयोगटातील मुलांनी लसीकरण ट्रायलसाठी पुढे यावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. फक्त सुदृढ मुलांनाच या ट्रायलमध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे. 50 मुलांना डोस द्यायचे असून त्यापैकी 25 मुलांना लस आणि 25 मुलांना प्लासिबो दिले जातील. कोणत्याही कोमॉर्बिड मुलाला किंवा कोरोना संसर्ग झालेल्या मुलाची निवड करण्यात येणार नाही. शिवाय, अँटीबॉडीज ही नसल्या पाहिजेत. चाचणीत सामील झाल्यानंतर, मूल इतर कोरोना लस घेऊ शकत नाही. चाचणीसाठी मुलांच्या पालकांकडून परवानगी घेणे अनिवार्य आहे.

तीन डोस घ्यावे लागणार

यामध्ये पहिल्या दिवशी, 28 व्या दिवशी दुसरा डोस आणि तिसरा डोस 56 दिवसांनी मुलांना दिला जाणार आहे. नावाच्या नोंदणीची प्रक्रिया झाल्यानंतर आणि ठरवलेल्या निकषांमध्ये बसणाऱ्या मुलांचाच या ट्रायलमध्ये सहभाग असेल अशी माहिती डॉ. भारमल यांनी दिली आहे.

हेही वाचा: मंत्रिपद मिळवणं हा माझ्या राजकारणाचा पाया नाही- पंकजा मुंडे

चाचणीतून काय समजणार

कोरोना संक्रमणापासून मुलांना संरक्षण देण्यासाठी ही लस किती प्रभावी आहे? लस घेतल्यानंतर एखाद्या मुलास संसर्ग झाल्यास, बरे होण्यास किंवा रोगाची प्रगती थांबवण्यास किती सक्षम आहे? लस घेतल्यानंतर मुलांमध्ये किती दिवस प्रतिकारशक्ती टिकून राहिली. ही लस किती सुरक्षित आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम आहेत?

दोन मुलांची निवड

या क्लिनिकल ट्रायलसाठी दोघांची स्क्रिनिंग झाली असून त्यांची निवड करण्यात आली आहे. अशा 50 मुलांचा टप्पा गाठायचा आहे. 15 ते 20 दिवसांत निवड प्रक्र‍ियेसह डोस देऊन त्यांच्या निरीक्षणाची प्रक्र‍िया पूर्ण होईल.  निरीक्षण म्हणजे त्यांना काही लक्षण किंवा दुष्परिणाम जाणवतात का? हे संपर्क करुन जाणून घेतले जाईल.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका(आरोग्य)

loading image