बालमृत्यू रोखण्यासाठी बालसंजीवनी छावणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

कुपोषणचा समूळ नायनाट व्हावा, यासाठी जव्हारमध्ये बालसंजीवनी छावणी सुरू करण्यात आली आहे.

जव्हार (बातमीदार) ः जव्हार, मोखाडा या तालुक्‍यात कुपोषणाचा गंभीर प्रश्‍न भेडसावत आहे. येथे दरवर्षी बालमृत्यू, मातामृत्यू होत असून ते कमी व्हावेत, कुपोषणचा समूळ नायनाट व्हावा, यासाठी जव्हारमध्ये बालसंजीवनी छावणी सुरू करण्यात आली आहे. या छावणीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

विठू माऊली ट्रस्ट आणि श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संजीवनी छावणी सुरू करण्यात आली आहे. याच्या उद्‌घाटनप्रसंगी ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार पासकल धनारे, श्रमजीवी संघटना संस्थापक विद्युलता पंडित, बाल संजीवनी छावणीचे संस्थापक विवेक पंडित, खासदार राजेंद्र गावित, भाजप महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र भोये, विठू माऊली ट्रस्टचे अध्यक्ष विजय पाटील आदी उपस्थित होते. 

माझे ग्रामीण भागावर खूप प्रेम आहे. या भागात काहीतरी चांगले काम करावे, असे मनापासून वाटते. या भागातील कुपोषण कायमस्वरूपी कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले. 

छावणीमध्ये 100 बालक, मातांवर उपचार 
कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे आढावा समितीचे राज्यस्तरीय अध्यक्ष विवेक पंडित यांनी कुपोषित बालकांसाठी छावणी सुरू केली आहे. यामध्ये कुपोषित बालक, गर्भवती, स्तनदा माताना मोफत उपचार दिले जाणार असून त्यांना मोफत पोषण आहार दिला जाणार आहे. छावणीमध्ये 100 कुपोषित बालक आणि मातांवर सुदृढ होईपर्यंत आवश्‍यक उपचार केले जाणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children's camp in Jawar to prevent child deaths