सिडकोचे ४३ लाख खड्ड्यात

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

महिनाभरात रस्त्याची दुरवस्था; करंजाडेतील नागरिक संतप्त

मुंबई : करंजाडे वसाहतीमधील रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्यासाठी जून महिन्यात सिडकोकडून ४३ लाख रुपये खर्च करण्यात आले होते; मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे दुरुस्त केलेल्या सर्वच रस्त्यांची खड्डे पडून दुरवस्था झाली असल्याने सिडकोने रस्ते दुरुस्तीकरीता खर्च केलेले लाखो रुपये खड्ड्यात गेल्याचा आरोप करंजाडे नोड फ्लॅट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत गुजर यांनी केला आहे.

खड्डे बुजवण्यासाठी सिडकोने नेमलेल्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचेही त्‍यांनी सांगितले. उघडी गटारे, बंद असलेले पथदिवे, दुरवस्था झालेले रस्ते यामुळे करंजाडे वसाहतीत राहायला आलेल्या नागरिकांकडून सिडको प्रशासनाच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सिडको प्रशासन एकीकडे खारघर वसाहतीमध्ये चांगल्या सुविधा देण्यासाठी करोडो रुपये खर्च करते; तर दुसरीकडे करंजाडे वसाहतीला पायाभूत सुविधा देण्यासही टाळाटाळ करते, असा भेदभाव का? असा संतप्त सवाल नागरिक विचारात आहेत. वसाहतीमधील सर्वच भागात  सांडपाणी रस्त्यावर आल्‍याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्तेदुरुस्ती करताना वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने वसाहतीमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. 
- रमेश आगरे, रहिवासी

करंजाडे वसाहतीमधील समस्यांबाबत तेथील जबाबदारी सांभाळणारे अधिकारी चांगली माहिती देऊ शकतील. 
- प्रभाकर फुलोरी, वरिष्ठ अधिकारी, सिडको
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cidco 43 lacks waste on road