शिवसेनेच्या शाखाप्रमुखाकडून सिडकोला कोट्यवधींचा गंडा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

नवी मुंबई -बनावट कागदपत्रांद्वारे सिडकोचा कोट्यवधींचा भूखंड परस्पर विक्री करून गंडा घालणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. निळकंठ म्हात्रे असे शाखाप्रमुखाचे नाव असून त्याच्यासह साथीदार अविनाश कोळी व संजय कोळी यांना अटक केली आहे. 

नवी मुंबई -बनावट कागदपत्रांद्वारे सिडकोचा कोट्यवधींचा भूखंड परस्पर विक्री करून गंडा घालणाऱ्या शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह दोघांना नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. निळकंठ म्हात्रे असे शाखाप्रमुखाचे नाव असून त्याच्यासह साथीदार अविनाश कोळी व संजय कोळी यांना अटक केली आहे. 

बेलापूर सेक्‍टर 19 व 20 येथील भूखंड क्रमांक 317 ते 319 या 552.75 चौरस फूट क्षेत्रफळ आकाराच्या भूखंडांवर चार मजली इमारत उभी असून भूखंडाचे वाटप झाले नसल्याचे सिडकोच्या लक्षात आले होते. त्यानुसार सिडको प्रशासनाने अंतर्गत चौकशीला सुरुवात केल्याची कुणकुण आरोपी निळकंठ म्हात्रे यांना लागली होती. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून स्वतः म्हात्रे यांनी त्रयस्त व्यक्तीकडून एक कोटी रुपयांची फसवणुकीची तक्रार आर्थिक गुन्हे विभागाकडे केली होती. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सिडकोकडे चौकशी केली. त्यावेळी म्हात्रे साडेबारा टक्के भूखंडांचे लाभार्थी असल्याची माहिती पोलिसांना सिडकोकडून मिळाली. त्यामुळे म्हात्रे यांनी आपल्याला ऐकवलेली गोष्ट बतावणी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी सखोल तपास केला असता म्हात्रे यांनी त्यांच्या दोन मित्रांच्या मदतीने सदरच्या भूखंडाचे बनावट वाटप पत्र, इरादा पत्र, सीमांकन, नकाशा असे अनेक बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली. 

तिघांना पोलिस कोठडी 
सिडकोसोबत भूखंडाचा त्रिपक्षीय बनावट करारही करण्यात आला होता. तयार केलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधाराने 2014 ते 2015 दरम्यान हितेश रावडिया याच्यासोबत भूखंड विक्री व्यवहार करण्यात आला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात मिळालेल्या पुराव्यानुसार 31 मार्चला अविनाश कोळी व संजय कोळी या दोघांना अटक करण्यात आली; तर 3 एप्रिलला निळकंठ म्हात्रे यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी तिघांना बेलापूर न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. मात्र बनावट कागदपत्रे तयार करण्यात आरोपींना मदत करणाऱ्या सिडको व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषन विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सोनावणे यांनी दिली आहे. 

Web Title: CIDCO billions of crores of rupees from Shivsena leader