सिडको भवन प्रवेश आता खूपच सोपा!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सिडको भवनात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता सिडको भवनातील मजल्यांनुसार वेगवेगळे पास घ्यावे लागणार आहेत. सिडको विभागात दलालांमार्फत होणारे जमीन व कागदपत्रांचे घोटाळे रोखण्यासाठी दक्षता विभागाने ही क्‍लृप्ती सुचवली आहे.

नवी मुंबई : सिडको भवनात विविध कामांसाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना आता सिडको भवनातील मजल्यांनुसार वेगवेगळे पास घ्यावे लागणार आहेत. सिडको विभागात दलालांमार्फत होणारे जमीन व कागदपत्रांचे घोटाळे रोखण्यासाठी दक्षता विभागाने ही क्‍लृप्ती सुचवली आहे. मागील काही दिवसांपासून सिडकोमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे. यात बाहेरील हस्तक्षेप अधिक असल्यामुळे त्याचे प्रमाण कमी होण्यासाठी हा उपक्रम सिडको प्रशासनाने सुरू केला आहे. 

महत्त्वाची बातमी : तुम्हाला घरचं जेवण हवंय? आता ‘अर्जुन कपूर’ पाठवेल तुम्हाला ‘घर का खाना’...

सिडको भवनमध्ये नागरिकांना प्रवेशासाठी आता प्रत्येक मजल्यानुसार विशिष्ट रंगाच्या पासवरच प्रवेश मिळणार आहे. नागरिकांना ज्या मजल्यावर काम आहे त्या मजल्याच्या विशिष्ट रंगाचा पास सुरक्षा विभागाकडून दिला जाणार आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांच्या निर्देशानुसार सोमवारपासून (16 डिसेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरिकांना प्रथम मजल्यासाठी पिवळा, दुसऱ्या मजल्यासाठी लाल, तिसऱ्या मजल्यासाठी निळा, चौथ्या मजल्यासाठी जांभळा, पाचव्या मजल्यासाठी पांढरा, सहाव्या मजल्यासाठी गर्द निळा व सातव्या मजल्यासाठी हिरवा या रंगाचे पास जारी केले जाणार आहेत. नागरिकांनी ज्या रंगाचा पास घेतला आहे, केवळ त्याच मजल्यावर नागरिकांना जाण्याची मुभा असणार आहे. इतर मजल्यावर जाण्यासाठी त्या व्यक्तीला आधीच्या पासवर विभागप्रमुखांची सही घेऊन तो पास जमा करून, पुढील इच्छित मजल्याच्या रंगाचा स्वतंत्र पास जारी करून घ्यावा लागणार आहे. 

नागरिकांची गैरसोय टळणार 
अनेक नागरिकांना त्यांचा इच्छित विभाग व संबंधित अधिकारी कोणत्या मजल्यावर आहेत. त्याची माहिती नसल्याने त्यांना फिरत बसावे लागते. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी सिडकोतर्फे हे पाऊल उचलण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांचा अतिरिक्त वेळ खर्च न करता त्यांच्या इच्छित विभागात सहजतेने जाता येणार आहे. यातून सिडकोच्या कामकाजात सुसूत्रता येऊन नागरिकांची कामेही त्यातून सुलभतेने पार पडण्यास निश्‍चितच मदत होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cidco building access is very convenient!