सिडकोच्या ग्राहकांना मिळणार फ्री होल्डचे फायदे 

सिडकोच्या ग्राहकांना मिळणार फ्री होल्डचे फायदे 

नवी मुंबई - नवी मुंबईत सिडकोच्या जागेत भाडेकरारावर राहणाऱ्या (भाडेपट्टा) रहिवाशांना लीज होल्डऐवजी फ्री होल्डप्रमाणे सर्व सुविधा मिळण्यासाठी भाडेपट्ट्याच्या काही अटी शिथिल करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच सिडको संचालक मंडळाने मंजुरी दिली. ही माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. या निर्णयाचा सिडकोच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. 

नवी मुंबईतील जमीन लीज होल्ड (भाडेपट्टा) वरून फ्री होल्ड (नियंत्रणमुक्त) करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिकांसह लोकप्रतिनिधी व भागधारकांकडून सातत्याने करण्यात येत होती. नवी मुंबईत सिडको आणि महापालिका अशा दोन स्थानिक संस्था कार्यरत असल्याने येथील रहिवाशांना त्यांच्या जागेच्या अथवा घराच्या हस्तांतरण/तारण/वापरात बदल यासाठी सिडकोकडून आवश्‍यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याबाबत अनेक अडचणी येत होत्या. यासाठी वारंवार आकारल्या जाणाऱ्या हस्तांतरण शुल्कामुळे रहिवाशांमध्ये चीड निर्माण झाली होती. नवीन नियमांनुसार घराच्या हस्तांतरणास सिडकोच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता भासणार नाही; मात्र भविष्यात लीजधारकाला लीज होल्ड जमिनीसंबंधी अतिरिक्त हक्क उपभोगता यावेत यासाठी सुधारित भाडेपट्टा निश्‍चित करण्यात आला आहे. 

नाशिक व औरंगाबादमध्ये योजना लागू 
ही योजना साडेबारा टक्के व साडेबावीस टक्के योजनांतर्गत वाटप करण्यात आलेल्या भूखंडांनाही लागू असणार आहे. तसेच नवी मुंबईसह ही योजना सिडकोच्या नाशिक व औरंगाबाद येथील नवीन शहरांनाही लागू असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com