कर्मचाऱ्यांच्या स्नेहसंमेलनावर सिडकोची लाखोंची उधळपट्टी

सुजित गायकवाड
मंगळवार, 26 मार्च 2019

कर्मचाऱ्यांना हवे होते सोन्याचे नाणे! 
यंदा सिडको सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने महामंडळाने कर्मचाऱ्यांना आर्थिक भेट म्हणून प्रति कामगार ३० हजार रुपये किंवा एक सोन्याचे नाणे द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. मात्र, संचालक मंडळाने प्रति कामगार १९ हजार रुपये देण्याचे मंजूर केले.

नवी मुंबई - संगीतखुर्ची, अंताक्षरी यांसारख्या महान क्रीडा स्पर्धांतील यशाबद्दल भरघोस पारितोषिके, सोबतीला ‘रेकॉर्ड डान्स’सारखे आपल्या संस्कृतीचा झेंडा मिरवणारे कार्यक्रम आणि मग साधीशीच जेवणावळ. इतकी साधी की त्यातील भोजनाच्या एका ताटाची किंमत सुमारे सातशे रुपये फक्त... हे कोणा धनिकपुत्राच्या राजेशाही विवाहसोहळ्याचे वर्णन नाही. हा श्रीमंती थाट आहे सरकारी आस्थापना असलेल्या सिडकोतील स्नेहसंमेलनाचा. दोन वर्षांत या संमेलन नामक कार्यक्रमावर सर्वसामान्य करदात्यांच्या खिशातील तब्बल एक कोटी रुपयांची उधळण करण्यात आली असून, यंदा सिडकोच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने तर यावरही वरताण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. यंदा सिडकोच्या कर्मचाऱ्यांना भरपेट भोजनाबरोबरच प्रत्येकी तब्बल १९ हजार रुपयांची दक्षिणाही देण्यात येणार आहे.

सिडकोच्या स्थापना दिनानिमित्ताने दरवर्षीच अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन होत असते. सुमारे ५० वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या या संमेलनावर कोणाचाही आक्षेप नाही, मात्र संमेलनावर करण्यात येणाऱ्या आर्थिक उधळपट्टीवर सिडकोचे काही सुजाण कर्मचारीच टीका करत आहेत. या स्नेहसंमेलनावरील खर्चाची दोन वर्षांची आकडेवारी सोबत जोडली आहे. या दोन संमेलनांवर सुमारे एक कोटी रुपये खर्च झाल्याचे त्यातून दिसत आहे. सिडकोच्या सुमारे १७०० कर्मचाऱ्यांच्या निव्वळ जेवणावळीवर  १७ ते १९  लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक वस्तुस्थिती त्यातून समोर आली आहे. संमेलनासाठी सिडको दरवर्षी बिनशर्त देत असलेले लाखो रुपयांचे अनुदान हा नागरिकांच्या पैशाचा अपहारच असल्याची टीका त्यामुळे होत आहे.

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखालील क्रीडा व सांस्कृतिक समितीतर्फे या संमेलनाचे नियोजन केले जाते. या समितीचे उपाध्यक्ष सहव्यवस्थापकीय संचालक असतात, तर उर्वरित पदांवर कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. असे असूनही त्या खर्चाचा हिशेबही नीट सादर केला जात नाही. खर्च केलेल्या रकमेच्या पावत्या सादर केल्या जात नाहीत, असे उघडकीस आले आहे.

स्नेहसंमेलन झाल्यानंतर उरलेला निधी सिडकोला परत करणे आवश्‍यक आहे. मात्र त्याऐवजी ती रक्कम या समितीच्या बचत खात्यावर जमा केली जाते. त्यामुळे सिडकोचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून, त्याबाबत लेखापरीक्षणात साधा आक्षेपही नोंदवला गेलेला नाही. या स्नेहसंमेलनानिमित्त होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धांसाठी दर वर्षी नवीन साहित्यांची खरेदी होते. हे साहित्य एका वर्षात खराब कसे होते, ते दर वर्षी नव्याने खरेदी करण्याची गरज का भासते, हा प्रश्‍नही संबंधित लेखापरीक्षकांना पडलेला नाही, हेही विशेष. 

सिडकोने यंदाच्या स्नेहसंमेलनासाठीच्या अनुदानात १० टक्के वाढ केली आहे. या संमेलनासाठी सिडकोने तब्बल ५० लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. सिडकोकडून होत असलेल्या अवाजवी खर्चाबाबतच्या प्रतिक्रियेसाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नीलेश तांडेल यांनी बोलण्यास नकार दिला. 

उधळपट्टी (आकडे रुपयांमध्ये) २०१७.... २०१८ 
झालेला खर्च - ४७,४५००० .... ४६,४९,००० 
सिडकोने दिलेले अनुदान - ४१,८०,००० .... ३४,६५,००० 
मंडप आणि डेकोरेशन - ५,९१,०००.... ७,८१,००० 
जेवणावळीवर झालेला खर्च - १९,६०,००० .... १७ लाख 
क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम - ९,३१,००० ....१२,६४,००० 
समितीच्या बॅंक खात्यावरील आधीची शिल्लक - ११,००,०००.... ११,२७,००० 

नवी मुंबई पालिकेला येणारा खर्च
- नवी मुंबई महापालिकेला वर्धापन दिनासाठी जास्तीत जास्त तीन-चार लाख रुपये खर्च येतो.
- या स्नेहसंमेलनादरम्यान १६ प्रकारच्या स्पर्धा होतात.
- जेवणाच्या प्रति थाळीसाठी येणारा खर्च (अडीच हजार कर्मचारी) ः ११० ते ११५  
- पालिकेचे ८०० हून अधिक कर्मचारी सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी होतात.
-  पालिकेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या कपड्यांचे भाडे ः ३५ ते ४० हजार

कर्मचाऱ्यांना हवे होते सोन्याचे नाणे! 
यंदा सिडको सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने महामंडळाने कर्मचाऱ्यांना आर्थिक भेट म्हणून प्रति कामगार ३० हजार रुपये किंवा एक सोन्याचे नाणे द्यावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. मात्र, संचालक मंडळाने प्रति कामगार १९ हजार रुपये देण्याचे मंजूर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cidco Get Together Expenditure Employee