सिडकाेचा तडाखा; हप्ते न भरल्याने घरे रद्द करण्याचा निर्णय

सुजित गायकवाड
Saturday, 10 October 2020

सिडकोने घरांचे हप्ते भरण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ केली. लॉकडाऊनच्या मुदतवाढीनुसार हप्ते भरण्याच्या मुदतीतही सिडकोकडून वाढ देण्यात आली. तसेच मुदतवाढीदरम्यान लावण्यात येणारा विलंब शुल्कही माफ करण्यात आला. त्यानंतरही अनेकांनी सुरुवातीपासूनच्या मुदतीपर्यंत घराचा एकही हप्ता भरला नाही. 

नवी मुंबई : महाप्रकल्पातील घराचा एकही हप्ता न भरणाऱ्या विजेत्यांची घरे सिडकोने रद्द केली आहेत. या निर्णयामुळे एक हजार 726 ग्राहकांना झटका बसला आहे. दुसरीकडे एकपेक्षा अधिक हप्ते भरणाऱ्या विजेत्यांना 28 डिसेंबर 2020 पर्यंत सवलत देऊन हप्त्यांवरील विलंब शुल्कही माफ केले आहे. 

हे वाचा : मुंबई विद्यापीठाच्या वेळापत्रकात गोंधळ

सिडकोतर्फे खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या ठिकाणी अत्यल्प आणि अल्पउत्पन्न गटातील नागरिकांसाठी महागृहप्रकल्पांतर्गत 14 हजार 838 घरे बांधण्यात येत आहेत. या लॉटरीतील यशस्वी ग्राहकांना घरे खरेदीची संधी देण्यात येणार आहे. सिडकोतर्फे साधारणतः ऑक्‍टोबर 2019 पासून हप्ते भरण्यास विजेत्यांना सांगितले होते. मार्चपर्यंत तीन हप्ते भरण्यास मुदत होती.

दोन हप्त्यांमध्ये साधारणतः सव्वा ते दीड महिन्याचे अंतर दिले होते. त्यानुसार अखेरचा हप्ता जून 2020 पर्यंत भरणे अपेक्षित होते. मात्र, यादरम्यानच्या काळात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे सरकारने संचारबंदी लागू करून लॉकडाऊनचा कालावधी सुरू झाला. त्यामुळे या काळात अनेकांच्या नोकरी गेली; तर काहींच्या पगारात कपात सुरू झाली. तसेच बॅंकाही बंद असल्याने हप्ते भरण्यात ग्राहकांना अडचणी येत होत्या. परंतु यातून ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून सिडकोने दोन वेळा मुदतवाढ केली. लॉकडाऊनच्या मुदतवाढीनुसार हप्ते भरण्याच्या मुदतीतही सिडकोकडून वाढ देण्यात आली. तसेच मुदतवाढीदरम्यान लावण्यात येणारा विलंब शुल्कही माफ करण्यात आला. त्यानंतरही अनेकांनी सुरुवातीपासूनच्या मुदतीपर्यंत घराचा एकही हप्ता भरला नाही. 

हे वाचा : एसटी कामगारांच्या वेतनाचा तिढा कायम 

अशा ग्राहकांना पुन्हा संधी देण्यास सिडकोने नकार दिला आहे. ज्या लोकांनी एकही हप्ता भरला नाही अशा एक हजार 726 लोकांची घरे रद्द करण्यात येणार आहेत. लवकर त्यांना पत्राद्वारे, तसेच ऑनलाईन निवारा संकेतस्थळावर नोटीस देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CIDCO's decision to cancel houses due to non-payment of installments