सिडकोच्या सेवा ऑनलाइन मिळणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

सिडकोच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सर्व सेवा यापुढे ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

नवी मुंबई : सिडकोच्या वसाहत विभागातर्फे देण्यात येणाऱ्या सर्व सेवा यापुढे ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, वसाहत विभागाच्या सेवांचे सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. सिडकोच्या संकेतस्थळावर या ऑनलाइन सेवांकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

वसाहत विभागाशी संबंधित विविध नागरी सेवांचे सुलभीकरण करण्याच्या उद्देशाने या सेवांशी संबंधित प्रक्रियांचा आढावा घेऊन, ऑनलाइन शुल्क भरण्याची सुविधा सिडकोने यापूर्वीच उपलब्ध करून दिली. याशिवाय अर्जदारांना स्कॅन केलेली कागदपत्रे सादर करण्याची मुभा देणे, नागरिकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहन देणे, डिजिटल स्वाक्षरी असलेल्या परवानग्या/ना-हरकत प्रमाणपत्रे ऑनलाइन पाठवणे हे निर्णय घेतले, परंतु बहुतांशी सेवा ऑनलाइन केल्यानंतरही सिडकोच्या नोडल कार्यालयांमधील नागरिक सुविधा केंद्रावर (सीएफसीज्‌) ऑफलाइन अर्ज सादर करण्याचा पर्याय ३१ ऑक्‍टोबरपर्यंत उपलब्ध करून देण्यात आला होता; मात्र आता वसाहत विभागाच्या सेवांशी संबंधित प्रक्रिया ऑनलाइन करण्याच्या निर्णयाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत २२,७०० हून अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत, परंतु यांपैकी केवळ ४६० अर्जदारांनीच आवश्‍यक कागदपत्रे ऑनलाइन सादर केली आहेत. तसेच ज्यांनी आपले ई-मेल आयडी सादर केले, अशा केवळ ६०० अर्जदारांनाचा डिजिटल स्वाक्षरी असलेली ना-हरकत प्रमाणपत्रे त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आली आहेत.

वसाहत विभागाशी संबंधित सर्व नागरी सुविधा केंद्रे बंद करून यापुढे आवश्‍यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतींसह केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज स्वीकारण्याचे निर्देश लोकेश चंद्र यांनी दिले आहेत. त्यामुळे भविष्यात वसाहत विभागाशी संबंधित परवानग्या/ना-हरकत प्रमाणपत्रेही अर्जदारांच्या ई-मेल आयडीवरच पाठवण्यात येणार आहेत. याकरिता अर्जदार नागरिकांनी ऑनलाइन सेवा प्राप्त करताना आपले वैध ई-मेल आयडी द्यावेत, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

वसाहत विभागाच्या सेवा ऑनलाइन करण्याच्या सिडकोच्या निर्णयामुळे अर्जदार नागरिकांच्या वेळेत बचत होण्यासह संबंधित सेवा त्यांना अधिक पारदर्शक, सुलभ व जलद पद्धतीने मिळणार आहेत.
- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cidco's services will be available online