कल्याण - कचरा विघटन समस्येवर नागरिकांचा सहभाग

KDMC
KDMC

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र याला शहरातील नागरिकांची साथ मिळत नसल्याने हे प्रयत्न अपूरे पडत आहेत. सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्याला नागरिकांचा उत्स्फुर्त पाठींबा मिळत असल्याचे दिसत आहे. या प्रयत्नांना भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचीही साथ मिळत आहे. 

मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच कडोमपानेही वीस हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या निवासी संकुलांनी कचऱ्याच्या विघटनासाठी आपल्या संकुलात व्यवस्था करावी अशी सूचना केली आहे. या संकुलात तयार होणारा कचरा आणि तेथे उपलब्ध असलेली जागा याचा मेळ बसत नसल्याने याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र नागरिकांनी या सूचनेचा गांभीर्याने विचार करावा यासाठी घाणेकर यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी त्यांनी कचऱ्याचे विघटन करणाऱ्या प्रक्रियेची प्रात्येक्षिक दाखवण्यास सुरुवात केली आहे. काही शिक्षण संस्था तसेच काही गृहनिर्माण संकुलात हे प्रात्येक्षिक दाखवले गेले आहे. 

केंद्र शासनाच्या कृषी विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद, उत्तरप्रदेश (राष्ट्रीय जैविक शेती केंद्र) या संस्थेच्या संशोधकांनी संस्थेचे संचालक डॉ किशन चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट डिकंपोझरचे संशोधन केले आहे. याचे वैज्ञानिक प्रयोग सिद्ध होऊन प्रत्यक्ष शेतामध्ये त्याचा वापरही प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरु झाला आहे.

वेस्ट डिकंपोझर  कोणत्याही प्रकारच्या जैविक कचऱ्याचे रुपांतर कंपोस्ट खतामध्ये करतो. अवघ्या एक महिन्यात शास्त्रोक्त पद्धतीने ही विल्हेवाट लावली जाते. या प्रक्रियेत कोणतीही दुर्गंधी, डास, चिलटे, माश्या यांचा  प्रादुर्भाव होत नाही. देशी गायीच्या शेणामधून तीन प्रकारचे जिवाणू (बॅक्टेरीया) वेगळे करून त्याचे पेस्ट स्वरुपात कल्चर तयार करुन हे  डिकंपोझर करण्यात आले आहे. या जिवाणूंचे कार्य कोणत्याही जैविक काडीकचऱ्याचे रूपांतर, त्यातील सेल्युलोजचे विघटन करून कंपोस्टमध्ये करणे आणि कोणत्याही प्रकारची कीड अथवा रोग पिकांवर आला असल्यास त्याचे नियंत्रण अथवा उच्चाटन करणे असे आहे.  

वेस्ट डिकंपोझर दोनशे लिटर पाण्यात  एका प्लॅस्टिक बॅरलमध्ये घेऊन त्यात २ किलो गूळ घालून त्या द्रावणात वेस्ट डिकंपोझरचे कल्चर मिसळावे व हे द्रावण दिवसात दोन वेळा साधारणपणे एक ते दीड मिनिट ढवळावे. सुमारे ५ ते ६ दिवसांत ह्या द्रावणाचा रंग बदलून हे द्रावण मदर कल्चर या स्वरूपात रूपांतरीत होते. यातील सुमारे १० लिटर द्रावण वेगळे काढून ठेवल्यास त्याचा वापर हे वेस्ट डिकंपोझर मोठ्या प्रमाणात पुन्हा बनवण्यासाठी करता येतो. या वेगळ्या काढलेल्या द्रावणात नव्याने १९० लि. पाणी घेऊन व २ किलो गूळ मिसळून आधी केल्याप्रमाणे पाच दिवस दिवसातून दोन वेळा हे द्रावण ढवळावे. यानंतर सुमारे पाच ते सहा दिवसांत याचे द्रावण तयार होते. अशा रितीने हे द्रावण कितीही मोठ्या प्रमाणावार बनवता येते. एकदा हे द्रावण तयार झाल्यावर त्यामध्ये असलेले जिवाणू (बॅक्टेरिया) विस्मयकारकरित्या कोणत्याही जैविक कचऱ्याचे रूपांतर उत्तम प्रतीच्या कंपोस्ट खतामध्ये अवघ्या तीस ते पस्तीस दिवसांत करत असून एका 200 लि. च्या बॅरलमधील द्रावणाच्या मदतीने 1000 टन जैविक कचऱ्याचे रूपांतर कंपोस्ट खतात होते. या पद्धतीने सद्यस्थितीत कोणत्याही शहरात उदभवणाऱ्या जैविक कचऱ्याचे रूपांतर जवळपास शून्य खर्चात व अल्पावधीत उत्तम प्रकारच्या कंपोस्ट खतामध्ये करता येते.

या सर्व प्रक्रियेत घरामध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण जैविक व अजैविक कचरा असे करणे आवश्यक असून अशा जैविक कचऱ्याचे रूपांतर आपण या पद्धतीने उत्तम प्रकारच्या कंपोस्ट खतात करून अजैविक कचऱ्याची विल्हेवाट हा कचरा रिसायकलींग (पुनर्वापर) करून करता येते. अजैविक कचऱ्यामध्ये काच, प्लॅस्टिक, धातू, फर्निचरचे लाकूड, थर्माकोल, रबर, ईलेक्ट्रॉनिक कचरा, बांधकामाच्या डेब्रीजचा समावेश होतो. 

पालिकेने हा कचरा उचलण्याची जबाबदारी घेतल्यास निवासी संकुले या प्रक्रियेस तयार होतील असा विश्वास घाणेकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com