ठाण्यातील कोरोना विलगीकरण केंद्राला नागरिकांचा विरोध!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून ठाणे शहरात विलगीकरण केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, पण श्रीनगर परिसरातील विलगीकरण केंद्र भरवस्तीत सुरू होत असल्याचा आक्षेप घेत स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला. अखेर हे केंद्रच रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.

ठाणे : कोरोना साथ रोखण्यासाठी महापालिका स्तरावरून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यानुसार ठाणे शहरात संभाव्य धोका ओळखून विलगीकरण केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे, पण श्रीनगर परिसरातील विलगीकरण केंद्र भरवस्तीत सुरू होत असल्याचा आक्षेप घेऊन स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे अखेर केंद्रच रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला आहे.

ही बातमी वाचली का? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने उचललं 'हे' पाऊल!

श्रीनगर भागात सुविधा भूखंडाच्या माध्यमातून पालिकेला पाच माजली इमारत उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी २५ खाटांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेऊन तातडीने शुक्रवारी संध्याकाळी काम सुरू करण्यात आले होते; मात्र भरवस्तीत इमारत असल्याने कोरोनाचे रुग्ण ठेवल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार असल्याने शुक्रवारी रात्री उशिरा नागरिकांनीच इमारतीमध्ये शिरकाव केला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रभारी पालिका आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. इमारतीमध्ये तीन मोठे हॉल आणि १२ स्वतंत्र रूम असूनणी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली होती. आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित करत नागरिकांनी इमारतीजवळ येऊन सफाईकाम थांबवले.

ही बातमी वाचली का? सिडकोत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा

नागरिकांकडून इमारतीचा ताबा
नागरिकांनीच इमारतींचा ताबा घेतल्याने पालिकेच्या यंत्रणेला काहीच काम करता आले नाही. अखेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर अाणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय तूर्तास थांबवण्यात आला. दरम्यान, रद्द केलेले विलगीकरण केंद्र प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरू करणे शक्‍य असल्यास त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens protest against the Corona dissociation center in Thane!